प्रकाश आंबेडकरांची काँग्रेस विरोधात ‘बॅटींग’ सुरूच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 12:48 PM2019-01-22T12:48:33+5:302019-01-22T12:52:02+5:30

अकोला- भाजपाचा विजयी रथ थांबविण्यासाठी विरोधकांची मोट बांधण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांमध्ये भारिप-बमसंचा सहभागही महत्त्वाचा होता. अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेससोबत आघाडीसाठी सकारात्मक भूमिका घेत १२ जागांचा प्रस्ताव दिला होता.

Prakash Ambedkar's 'batting' against Congress | प्रकाश आंबेडकरांची काँग्रेस विरोधात ‘बॅटींग’ सुरूच!

प्रकाश आंबेडकरांची काँग्रेस विरोधात ‘बॅटींग’ सुरूच!

Next

- राजेश शेगोकार

अकोला- भाजपाचा विजयी रथ थांबविण्यासाठी विरोधकांची मोट बांधण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांमध्ये भारिप-बमसंचा सहभागही महत्त्वाचा होता. अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेससोबत आघाडीसाठी सकारात्मक भूमिका घेत १२ जागांचा प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावाची दखल घेण्यात काँग्रेसने लावलेला वेळ, दरम्यानच्या काळात भारिप-बमसंने वंचित बहुजन आघाडीची स्थापना करून बहुजनांच्या अस्मितेला घातलेली फुंकर अन् एमआयएमसोबत घोषित केलेली मैत्री या सर्व घडामोडीमुळे महाआघाडीतील अ‍ॅड.आंबेडकरांच्या समावेशाला अनेक अडथळे निर्माण झाले; मात्र हे सारे बेदखल करीत काँग्रेस अ‍ॅड.आंबेडकरांच्या बाबतीत प्रचंड आशावादी असल्याचे चित्र उभे करीत असतानाच दुसरीकडे अ‍ॅड.आंबेडकर मात्र काँग्रेसवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यामुळे काँग्रेस विरोधातील त्यांच्या ‘बॅटींग’मुळे महाआघाडीतील त्यांच्या समावेशाची शक्यताच धुसर झाली आहे.
अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी परवा अमरावतीला झालेल्या वंचित बहुूजन आघाडीच्या सभेत लोकसभेचा पाचवा उमेदवार जाहीर केला. अमरावती लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीनं गुणवंत देवपारे यांना उमेदवारी जाहीर केली. एकीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आता आंबेडकरांसोबत आघाडी होण्याबाबत आशावादी असतानाच दुसरीकडे प्रकाश आंबेडकर आपला एक-एक उमेदवार जाहीर करत आहेत. त्यामुळे काँग्रेस-आंबेडकरांच्या संभाव्य आघाडीचं त्रांगडं सुटण्याची शक्यता कमीच आहे. आंबेडकरांनी आतापर्यंत माढा, नांदेड, अमरावती, बुलडाणा आणि यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघातून उमेदवार जाहीर केलेत. विशेष म्हणजे जाहीर केलेल्या उमेदवारांच्या माध्यमातून अनेक वंचित समाजाला प्रतिनिधीत्व देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. पाच उमेदवारांत दोन धनगर, प्रत्येकी एक माळी, बौद्ध आणि बंजारा समाजाचे उमेदवार आहेत.
आंबेडकरांनी एमआयएमला सोबत घेत वंचित बहुूजन आघाडीची मोट बांधली. राज्यात औरंगाबादपासून एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांना सोबत घेत औरंगाबाद, सोलापूर, नांदेड, अमरावतीत जंगी सभा घेतल्या. एमआयएम आंबेडकरांसोबत असल्यानं काँग्रेसनं आंबेडकरांसोबतच्या प्रस्तावित आघाडीत अडचणी येत असल्याचं अनेकदा स्पष्ट केलंय. नांदेडच्या सभेत एमआयएमनं आंबेडकरांसाठी वंचित आघाडीतून बाजूला होण्याची तयारी दर्शविली. काँग्रेसने त्यानंतर आघाडीची मोठी अडचण दूर होणार असल्याचं सांगत आंबेडकरांना सोबत घेण्याचे संकेत दिलेत; मात्र काल अमरावतीत आंबेडकरांनी पाचवा उमेदवार जाहीर करीत आघाडीच्या शक्यता धुसर असल्याचेच शिक्कामोर्तब केले आहे. सोमवारी तर छगन भुजबळ यांच्या विरोधात उमेदवार न देता राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी रिंगणात उतरणार असल्याचे अधिकृतरीत्या स्पष्ट करण्यात आल्याने महाआघाडीतील अ‍ॅड.आंबेडकरांच्या समावेशाबाबत चित्रच स्पष्ट झाले आहे. या पृष्ठभूमीवर काँग्रेसचा आशावाद कशाच्या बळावर आहे? याचे कोडं खुद्द काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनच पडले आहे.

ओबीसीं जागरासाठी भुजबळांना पाठींबा

वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभे करण्याचे नियोजन अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. या नियोजनामागे ओबीसी ‘वोट बँक’ कॅश करण्याचा अ‍ॅड.आंबेडकरांचा प्रयत्न असून, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे लोकसभा निवडणूक लढवित असतील तर त्यांच्या विरोधात उमेदवार देणार नसल्याची घोषणा सोमवारी माजी आ.हरिदास भदे यांनी केली. ओबीसींचे नेते म्हणून भुजबळांची प्रतिमा देशपातळीवर निर्माण करण्यासोबतच भुजबळांचा प्रभाव असणाºया माळी समाजाच्या मतपेढीकडेही या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीने लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे.

 

Web Title: Prakash Ambedkar's 'batting' against Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.