Akola Lok Sabha ( Marathi News ) : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची महाविकास आघाडीसोबतची चर्चा फिस्कटली असून त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र भाजपला रोखण्यासाठी आपण काँग्रेसला राज्यातील सात लोकसभा मतदारसंघांमध्ये पाठिंबा देणार असल्याचं आंबेडकर यांनी यापूर्वीच जाहीर केलं आहे. त्यानुसार वंचित आघाडीने नागपूर आणि कोल्हापुरातील काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिला असून काँग्रेसने सुचवलेल्या आणखी पाच मतदारसंघांमध्येही वंचितकडून काँग्रेसला पाठिंबा दिला जाणार आहे. मात्र असं असलं तरी महाविकास आघाडीचा घटकपक्ष होण्यास नकार दिलेल्या वंचित आघाडीला अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसकडून पाठिंबा दिला जाणार नसल्याचे समजते. अकोला लोकसभा मतदारसंघातून स्वत: प्रकाश आंबेडकर यांनी आपली उमेदवारी जाहीर केली असून काँग्रेसकडून त्यांच्याविरोधात डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.
डॉ. अभय पाटील हे काँग्रेस पक्षाकडून ४ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं बोललं जात आहे. पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेदेखील उपस्थित राहू शकतात. काँग्रेस हायकमांडने अभय पाटील यांच्या उमेदवारीवर अंतिम शिक्कामोर्तब केलं असून पाटील यांनीही याबाबतच्या चर्चेला दुजोरा दिल्याचे वृत्त एबीपी माझाने दिलं आहे.
दरम्यान, अकोल्यातून काँग्रेस उमेदवार मैदानात उतरल्यास प्रकाश आंबेडकरांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. कारण या मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना उमेदवारी दिली असून काँग्रेस आणि वंचितचाही उमेदवार मैदानात उतरल्यास विरोधकांच्या मतांची विभागणी होऊन भाजपला फायदा होऊ शकतो.
काँग्रेसच्या पाठिंब्याबद्दल काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
अकोला लोकसभा मतदारसंघाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे की, " वंचित बहुजन आघाडी सात जागांवर काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार आहे. मात्र, त्या बदल्यात अकोल्यासाठी काँग्रेसला समर्थन मागणार नाही," असं आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे. "अकोल्यात तीन वेळा मला पाडण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मुस्लीम उमेदवार दिला. आज तेथे मुस्लीम उमेदवार दिला तरी आम्ही तुमच्या सोबत येणार नाही, अशी भूमिका मुस्लीम बांधवांनी घेतली आहे. त्यामुळे माझा विजय निश्चित आहे," असा दावाही त्यांनी केला.