डोणगाव (जि. बुलडाणा), दि. १६- राज्य महामार्गावर नागापूर शिवारात निवडणुकीसाठी मतदान केंद्राकडे जात असताना ठाणेदारांना १६ फेब्रुवारी रोजी दुपारी एका ट्रकच्या बाजूला एक इसम आगीत जळत असल्याचे निदर्शनास पडले. त्यांनी तत्काळ आग विझवून सदर ट्रकचालकाला रुग्णालयात दाखल केले. डोणगाव-मेहकर राज्य महामार्गावर नागापूर गावाच्या वेशीवर मुंबईकडे जाणारा एक ट्रक क्र.एम.एच.४३ वाय ७१६५ हा रस्त्याच्या कडेला उभा होता. यावेळी जिल्हा परिषदेचे मतदान असल्याने डोणगावचे ठाणेदार आकाश शिंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल शेख आसिफ व दंगाकाबू पथकाचे कर्मचारी हे गस्त घालीत अंजनी बु.कडे जात असताना, त्यांना सदर ट्रकच्या बाजूने चक्क एक इसम जळताना दिसला. ठाणेदार आकाश शिंदे व पोहेकॉ शेख आसिफ यांनी क्षणाचाही विलंब न करता गाडी थांबवून गाडीमध्ये असलेल्या पाण्याच्या कॅनने सदर व्यक्तीला विझविले व १0८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने त्वरित त्याला मेहकरकडे रवाना केले. सदर व्यक्ती ही ट्रकचालक असून, त्याचे नाव रोहिदास जाधव अूसन, तो कारंजा जि.वाशिम येथील असल्याची माहिती आहे. ट्रकचालकाला आग कशाने लागली, याची माहिती मिळू शकली नाही.
आगीत जळत असलेल्या ट्रकचालकाचे ठाणेदाराने वाचविले प्राण
By admin | Published: February 16, 2017 11:12 PM