अकोला : नागपूर येथील रहिवासी असलेल्या महिलेचा पतीसोबत वाद झाल्यानंतर रेल्वेने मुंबईकडे जात असताना महिलेची मनस्थिती खालावल्याने तिने अकोला रेल्वे स्थानकावर उतरून शेगाव रेल्वे रुळावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडला; मात्र महिला आत्महत्येच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळताच डाबकी रोड पोलीस स्टेशनच्या महिला पथकाने तातडीने रेल्वे रुळावर धाव घेऊन महिलेचे प्राण वाचविले. मुंबईतील घाटकोपर माहेर असलेल्या व नागपूर येथील सासर असलेल्या महिलेचे रविवारी आणि सोमवारी पतीसोबतच वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने महिला सोमवारी रात्री मुंबईकडे रेल्वेने जात असताना तिची मनस्थिती बिघडली. त्यामुळे ही महिला अकोला रेल्वे स्थानकावर उतरली. रात्रीचा मुक्काम रेल्वे स्थानकावर केल्यानंतर सदर महिला रेल्वे रुळावरूनच शेगावकडे निघाली होती. डाबकी रेल्वे गेटच्या पुढे गेल्यानंतर सदर महिला आत्महत्येचा प्रयत्न करीत असल्याची माहिती गेटमनला मिळाली. गेटमनने महिलेचा पाठलाग केल्याने तिने रेल्वेखाली उडी घेतली नाही; हा प्रकार महिला पोलीस पथकला कळविण्यात आला त्यांनी सदर रेल्वे मार्गाने सदर महिलेचा शोध घेण्यासाठी धाव घेतली असता दुपारी २ वाजताच्या सुमारास ती महिला पुन्हा एका रेल्वेखाली उडी घेण्याच्या तयारीत होती. त्याचवेळी डाबकी रोड पोलीस स्टेशनच्या महिला पथकातील अधिकारी माधुरी गायकवाड व पथकाने महिलेला ताब्यात घेतले व तीचे प्राण वाचविले. त्यानंतर या महिलेच्या माहेरचा शोध घेऊन त्यांच्या ताब्यात देणार असल्याची माहिती आहे.
आत्महत्येचा प्रयत्न करणा-या महिलेचे वाचविले प्राण
By admin | Published: June 29, 2016 2:05 AM