अकोला: नाटक ही सामुहिक कलाकृती असते. त्यासाठी सकारात्मकतेची नितांत गरज असते. कुठल्याही संस्थेमध्ये केवळ बोलून कार्य सिद्धीस जात नाही त्यासाठी संपूर्ण नियोजन आणि तंतोतत अमलबजावणीची देखील गरज असते. नाटक कलाप्रकार समृद्ध करण्यासाठी शैक्षणिक संस्थासह सांस्कृतिक आणि सामाजिक संस्थांनी पुढे येण्याची गरज आहे साेबतच प्रत्येक शहरांमध्ये सुसज्ज नाट्यगृह निर्माण झाली तर नाटक हे प्रेक्षकापर्यंत पाेहचेल, लाेकाभिमुख हाेईल असे मत चतुरस्त्र सिने-नाट्य अभिनेता प्रशांत दामले यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद, मलकापूर, शाखा अकोला व प्रभात किड्स स्कूलच्या संयुक्त विद्यमाने सोमवार २० मार्च रोजी आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी अ.भा.मराठी नाट्यपरिषद मुबंईचे माजी अध्यक्ष नरेश गडेकर, माजी आमदार प्रा तुकाराम बिरकड, ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप देशपांडे, अभामनाप मलकापूर शाखा अकोलाचे अध्यक्ष प्रा. मधू जाधव, अभामनाप कार्यवाह अशोक ढेरे व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते. संगीत कला अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल प्रशांत दामले यांचा हृद्य सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी सन्मानपत्राचे वाचन ॲड विनोद साकरकार यांनी केले.
यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप देशपांडे यांनी अभिनेता प्रशांत दामले यांच्या रंगभूमीच्या कार्यावर प्रकाश टाकला.मराठी नाट्य रसिकांनी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुबंईच्या अध्यक्षपदासाठी प्रशांत दामले यांची उमेदवारी दाखल केली असून त्यांच्या नेतृत्वात नाट्यक्षेत्राला नवी दिशा मिळेल असा विश्वास अ.भा.मराठी नाट्यपरिषद मुबंईचे माजी अध्यक्ष नरेश गडेकर यांनी त्यांच्या मनोगतातून व्यक्त केला.
तसेच अकोल्यातून नाट्यपरिषदेच्या जिल्हा कार्यवाह पदासाठी प्रा. मधू जाधव यांच्या माध्यमातून स्थानिक नाट्यचळवळीला बळ प्राप्त होणार असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक नाट्यपरिषदेचे कार्यवाह अशोक ढेरे यांनी केला. संचालन प्रभातच्या संजीवनी अठराळे यांनी केले तर आभार नाट्यपरिषदेचे सहकार्यवाह कपिल रावदेव यांनी मानले.