अकोला : राज्य लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या परीक्षेत शिवापूर येथील रहिवासी असलेला प्रशांत श्रीकृष्ण ढोरे याने घवघवीत यश संपादित केले आहे. ग्राम शिवापूर येथील अभ्यासिका तसेच आई भवानी व्यायामशाळेत त्याने केलेली कसरत प्रशांतला नायब तहसीलदार पदाच्या यशाला गवसणी घालण्यासाठी मोठी मदतीचे ठरले आहे.शिवापूर येथील रहिवासी श्रीकृष्ण ढोरे हे जिल्हा मध्यवर्ती बँकेतून रोखपाल पदावरून सेवानिवृत्त झाले; मात्र मुलगा मोठा अधिकारी व्हावा ही त्यांची अपेक्षा असल्याने त्यांचा मुलगा प्रशांत याने जिद्द आणि चिकाटीच्या बळावर गावातीलच अभ्यासिकेतील पुस्तकातून राज्य लोकसेवा आयोगाचा अभ्यास सुरू केला. या गावातील अभ्यासिका अनेकांना प्रेरणा देणारी असून, येथे असलेल्या आई भवानी व्यायामशाळेत सर्वच समाजातील युवक एकत्रित येत कसरत करतात तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. त्यामुळे प्रणवनेही याच ठिकाणावरून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केल्यानंतर २०१९ मध्ये राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत त्याने यश संपादित करून नायब तहसीलदार पदावर नियुक्ती मिळविली. प्रशांतने या यशाचे श्रेय आई-वडील तसेच गुरुजनांना दिले आहे. दोन हजार लोकसंख्येचे गाव असलेल्या शिवापुरातील ४५ जण पोलीस दलात कार्यरत असून, २० जण शिक्षण क्षेत्रात नोकरी करीत आहेत. १५ जण भारतीय सैन्यात असून, दोन मुली डॉक्टर झालेल्या आहेत. तर सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक केशवराव पातोंडही याच ठिकाणी अभ्यास करून पोलीस दलात रुजू झाले होते.
प्रशांत ढोरेची 'एमपीएससी'त बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 6:52 PM