मनपाच्या स्तरावर नाला सफाईला प्रारंभअकोला: मान्सूनपूर्व नाला सफाईच्या माध्यमातून स्वत:चे उखळ पांढरे करणाऱ्या कंत्राटदार, कर्मचारी व नगरसेवकांच्या अभद्र युतीला छेद देत महापालिका प्रशासनाने यंदा क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या स्तरावर नाला सफाई करण्याचा निर्णय घेतला. मनपाच्या तिजोरीवर अतिरिक्त ताण पडत असल्याची जाण ठेवून महापौर विजय अग्रवाल यांनीदेखील प्रशासनाला हिरवी झेंडी दिल्याने गुरुवारी नाला सफाईच्या कामाला सुरुवात करण्यात आली. पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील मोठ्या नाल्यांची साफसफाई होणे गरजेचे आहे. शहरातील मोठ्या नाल्यांची संख्या व त्यांची दुरवस्था झाल्यामुळे पावसाचे पाणी वाहून न जाता रस्त्यांवर किंवा सखल भागात साचत असल्याचा पूर्वानुभव आहे. आजपर्यंत नाला सफाईची कामे कंत्राटदारांमार्फत केली जात होती. त्यामध्ये कागदोपत्री नाला सफाई दाखवून लाखो रुपयांची देयके ओरपण्याचे काम मागील अनेक वर्षांपासून सुरू होते. अर्थातच यासाठी कंत्राटदार, संबंधित कर्मचारी व नगरसेवकांची मिलीभगत असल्याचे अनेकदा समोर आले. प्रामाणिकपणे नाला सफाई होत नसल्याने पावसाचे व नाल्यांमधील घाण पाणी सखल भागातील नागरिकांच्या घरात शिरत असल्याची बाब लक्षात घेता मनपा प्रशासनाने कंत्राटदारांची नियुक्ती न करता क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या स्तरावर नाला सफाई करण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने गुरुवारी पूर्व झोनमध्ये नाला सफाईच्या कामाला प्रारंभ झाला. महापौरांनी केली पाहणीपूर्व झोनमध्ये प्रभाग क्र.५ मधील चतुर्भुज कॉलनी येथून नाला सफाईच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी महापौर विजय अग्रवाल यांनी सदर कामाची पाहणी केली. यावेळी मनपा उपायुक्त समाधान सोळंके, सहायक आयुक्त डॉ. दीपाली भोसले, क्षेत्रीय अधिकारी अनिल बिडवे उपस्थित होते. क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सर्वाधिकार क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या स्तरावर नाला सफाईचा निर्णय घेण्यात आला असून, त्यांच्या दिमतीला जेसीबी व स्वच्छता विभागाची यंत्रणा आहे. खासगी सफाई कर्मचाऱ्यांच्या माध्यमातूनही नाला सफाई करण्याचे अधिकार क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यासाठी ठरावीक निधीची तरतूद करण्यात आली.
मान्सूनपूर्व नाला सफाईचा ठेका कंत्राटदारांना नाहीच!
By admin | Published: April 14, 2017 1:56 AM