हातरुण : हातरुण येथील वीज उपकेंद्रांतर्गत येत असलेल्या हातरुण, बोरगाव वैराळे, शिंगोली, मालवाडा परिसरात मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीची कामे तातडीने सुरू करण्यात आली असून लोंबकलेली वीजवाहिनी, तसेच वाकलेले विजेचे खांब दुरुस्त करण्याचे काम बुधवारी सुरू असल्याचे दिसून आले.
हातरुण परिसरात विजेच्या तारामध्ये झाडे-झुडपे वाढल्याने वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार सुरू होता. त्यामुळे पावसाळ्यात देखील हा त्रास वाढल्यास वीजपुरवठ्यात बिघाड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीची कामे करण्याबाबत हातरुण सरपंच वाजीद खान, ग्रामसेवक किशोर वाकोडे, शिंगोली सरपंच महेश बोर्डे, मालवाडा माजी सरपंच गणेश आढे, भाजप युवा नेते अक्षय खंडेराव यांनी हातरुण वीज उपकेंद्राचे सहायक अभियंता देवेंद्र तांबे यांच्याकडे पावसाळ्यापूर्वी देखभाल दुरुस्तीची कामे करण्याची मागणी केली होती. वरिष्ठ तंत्रज्ञ मोहमद अशपाक यांनी लोंबकळणारी वीजवाहिनी, वाकलेले विजेचे खांब दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न केले.
विजेच्या तारामध्ये झाडांच्या फांद्या वाढल्याने वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार सुरू होता.
पावसाळ्यापूर्वी देखभाल दुरुस्तीचे कामे सुरू झाल्याने पावसाळ्यात सुरळीत वीजपुरवठा होणार असल्याचे हातरुण वीज उपकेंद्राचे सहायक अभियंता देवेंद्र तांबे यांनी सांगितले.
मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीची कामे हातरुण वीज उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या गावात सुरू आहेत. वीजपुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घेण्यात येत असून नागरिकांनी सहकार्य करावे.
- देवेंद्र तांबे, सहायक अभियंता, वीज उपकेंद्र, हातरुण.