अकोला : तौक्ते चक्रिवादळामुळे जिल्ह्यात तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. वाऱ्याची गती वाढली असून गडगडाटासह मॉन्सून पूर्व पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तापमानातही घट पहावयास मिळत आहे.दोन दिवसांआधी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घरावरची टिनपत्रे उडाली, झाडे उन्मळून पडली. कोकणाच्या दिशेने येत असलेल्या तौक्ते वादळामुळे हे परिणाम दिसून आले. त्यानंतर सलग तीन दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. वादळ गुजरात राज्यात धडकले असून शांत झाले आहे; परंतु अद्यापही जिल्ह्यातील वातावरणात ढगाळलेले असून हवेतील आद्रता वाढलेली आहे. त्यामुळे जिल्हामध्ये गडगडाटसह मॉन्सून पूर्व पाऊस बरसण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती पुढील २-३ दिवस राहण्याचे अनुमान आहे. दक्षिण गोलार्धात मॉन्सून निर्मिती आणि हिंदी महासागरावरून होणारा मोसमी वाऱ्याचा प्रवाह/प्रवास सामान्य गतीने होतांना दिसत आहे. अंदमान निकोबार, केरळ राज्यात आगमन ठरलेल्या तारखेला होण्याची शक्यता आहे.
--बॉक्स--
वातावरणात बदल; आजार बळावण्याची शक्यता
जिल्ह्यातील वातावरणात बदल होत असल्याने व्हायरल फ्लू सह विविध आजार बळावण्याची शक्यता आहे. त्यामुळे लहान मुलांसह ज्येष्ठांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
कोकणात ७ जून तर विदर्भात मॉन्सून पोहोचण्यास १५-२० जूनपर्यंत वाट पहावी लागेल. तो पर्यंत स्थानिक स्वरुपात पूर्व मोसमी पावसाची हजेरी अपेक्षित आहे.
- संजय अप्तुरकर, हवामान अभ्यासक