अकोला: बीटी कपाशीचे बियाणे मे महिन्याच्या शेवटी मिळणार असल्याने यावर्षी पूर्व हंगामी बीटी कपाशीचे क्षेत्र अर्ध्याच्यावर घटणार असल्याची शक्यता आहे.पूर्व हंगामी कपाशीचे क्षेत्र राज्यात ५० हजार हेक्टरच्यावर आहे. यात सर्वाधिक क्षेत्र खान्देशातील जळगाव जिल्ह्यात २५ हजार हेक्टरवर आहे. विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात ५ हजार हेक्टर, वर्धा १ हजार तर अकोला जिल्ह्यात अकोट व तेल्हारा तालुक्यात १ हजार हेक्टरवर मान्सूनपूर्व कपाशीची पेरणी केली जाते. तथापि, मागील तीन-चार वर्षांपासून कपाशीवर गुलाबी बोंडअळीने आक्रमण करू न प्रचंड नुकसान केल्याने कृषी विभागाने बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी मे महिन्यात बीटी कपाशी बियाणे विक्रीवर बंदी घातली आहे. तसे निर्देश बियाणे वितरक, कंपन्यांना दिले आहेत. खरीप हंगामातील कापूस शेतकरी मार्चपर्यंत घेतात. त्यानंतर लगेच मे महिन्यात पूर्व हंगामी कपाशीची पेरणी केली जाते. बोंडअळीला मे महिन्यातच हे पीक उपलब्ध होत असल्याने पुढे हीच बोंडअळी खरिपातील कपाशीवर चालून येत असल्याचे निष्कर्ष आहेत. याच पृष्ठभूमीवर कृषी विद्यापीठ, कृषी विभागाने केलेल्या शिफारशीनुसार पूर्व हंगामी कापूस शेतकऱ्यांनी घेण्याचे टाळावे, असे कृषी विभागाचे प्रयत्न आहेत.