अकोला: शहरातील मोठ्या नाल्यांची मान्सूनपूर्व साफसफाई करण्यासाठी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी स्वच्छता व आरोग्य विभागाची यंत्रणा कामाला लावली आहे. नाले सफाईच्या माध्यमातून खिसे भरणाऱ्या कंत्राटदार-नगरसेवक तसेच संबंधित कर्मचाऱ्यांच्या ‘खाबुगिरी’ला आळा घालण्यासाठी आयुक्त कापडणीस यांनी यंदा एक मीटरपेक्षा मोठ्या नाल्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. नाले सफाईच्या नावाखाली ओरपल्या जाणारी लक्षावधींची देयके लक्षात घेता आयुक्तांनी आरोग्य निरीक्षकांचे चांगलेच कान उपटल्याची माहिती आहे.मान्सूनपूर्व नाला सफाई म्हणजे स्वच्छता विभागाचे कर्मचारी, कंत्राटदार आणि काही नगरसेवकांसाठी पैसे कमाविण्याचे आयते कुरण झाले आहे. या तिघांच्या अभद्र युतीमधून शहरातील नेमक्या कोणत्या नाल्यांची साफसफाई करायची, याची दिशा निश्चित करणे गरजेचे आहे. तत्कालीन आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या कालावधीत शहरातील प्रमुख २०० पेक्षा अधिक नाल्यांची प्रामाणिकपणे साफसफाई करण्यात आली होती. त्यासाठी केवळ आठ ते नऊ लाख रुपये मोजण्यात आले होते. मे महिन्यात मोठ्या नाल्यांची साफसफाई होणे अपेक्षित असताना तत्कालीन आयुक्त सोमनाथ शेटे यांच्या कालावधीत काही अधिकाºयांनी चक्क आॅगस्ट महिन्यात नाला सफाईची कामे केली होती, हे येथे उल्लेखनीय. नाला सफाईच्या कामांच्या निविदा जारी केल्यावरही मनपाच्या जेसीबीसह स्वच्छता विभागाची यंत्रणा जुंपत काही अधिकाºयांनी स्वत:हूनच नाला सफाईसाठी पुढाकार घेतला होता. या उफराट्या प्रकाराला तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी ‘ब्रेक’ लावला होता. शहरातील प्रमुख मोठ्या नाल्यांची प्रामाणिकपणे स्वच्छता केल्यास पावसाळ्यात सखल भागातील रहिवाशांच्या घरात पाणी साचणार नाही, याची तसदी घेण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. त्यानुषंगाने किमान एक मीटरपेक्षा मोठ्या नाल्यांची सफाई करण्याचा निर्णय आयुक्त संजय कापडणीस यांनी घेत तसे निर्देश जारी केले आहेत.पडीत प्रभागांमध्ये नगरसेवकांची मक्तेदारीशहरातील २३ पडीत क्षेत्रात खासगी तत्त्वावर प्रत्येकी १४ सफाई कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. १४ पैकी केवळ चार ते पाच कर्मचाºयांच्या माध्यमातून थातूरमातूर स्वच्छता करून उर्वरित कर्मचाºयांचे पैसे नगरसेवकांच्या खिशात जमा होत असल्याची माहिती आहे. या प्रभागांमध्ये नगरसेवकांची मक्तेदारी असल्यामुळे समस्या कायम असल्याचे चित्र आहे.याबाबत कापडणीस यांनी सांगीतले कीमान्सूनपूर्व नाले सफाईची जबाबदारी क्षेत्रीय अधिकाºयांवर सोपविली आहे. नाला सफाईत कोणत्याही प्रकारची कुचराई चालणार नाही. पावसाळ्यात पाणी साचल्यास संबंधित आरोग्य निरीक्षकांवर निश्चितच कारवाई होईल.नाला सफाई भ्रष्टाचाराचे कुरणमनपाकडून दरवर्षी प्रामाणिकपणे नाला सफाईचा दावा केला जात असतानाच अवघ्या सहा महिन्यांतच नाले घाणीने तुंबलेले दिसतात. नाला सफाईवर २०१७ मध्ये ३६ लाख तर २०१८ मध्ये ५९ लाख रुपये खर्च झाले. नाला सफाईच्या माध्यमातून लाखो रुपयांवर ताव मारल्या जात असताना कोणीही चकार शब्द काढत नाही, हे येथे उल्लेखनीय.