अकोला: एका २० वर्षीय युवतीला लग्नाचे आमिष दाखवून युवकाने तिचे लैंगिक शोषण केल्यामुळे युवतीला गर्भधारणा झाली. युवतीने त्याला लग्न करण्याची गळ घातली असता, युवकाने तो मी नव्हेच, अशी भूमिका घेतल्याने तिच्या तक्रारीनुसार सिव्हिल लाइन पोलिसांनी शुक्रवारी आरोपी विठ्ठल गोगटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार वर्षभरापूर्वी तिची मोठी उमरीत राहणारा विठ्ठल गोगटे याच्यासोबत ओळख झाली. त्याने तिला डिसेंबर २०१८ पासून लग्न करण्याचे आमिष दाखविले आणि तिचे लैंगिक शोषण केले. त्यामुळे युवतीला गर्भधारणा झाली. ही बाब युवतीने विठ्ठलला सांगितली तर त्याने लग्न करण्यास नकार दिला आणि तो मी नव्हेच, अशी भूमिका घेतली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, युवतीने पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी आरोपी गोगटे याच्याविरुद्ध भादंवि कलम ३७६, (२), (एन), ५०६ नुसार गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)