कोविड लसीकरणाची ही मोहीम चार टप्प्यांमध्ये नियोजित आहे. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये पोलीस, आपत्ती व्यवस्थापन, स्वच्छता कर्मचाऱ्यांसह इतर फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षांवरील सर्व सामान्य व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे, तर चौथ्या टप्प्यात आरोग्यविषयक समस्या असलेल्या ५० वर्षांआतील सर्वसामान्य नागरिकांचा समावेश करण्यात आला आहे. या चारही टप्प्यांमध्ये गरोदर तसेच स्तनदा मातांना कोविड लसीकरणापासून दूर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या चारही टप्प्यांमध्ये लाभार्थी जर गरोदर असेल, तर तिला सध्या तरी कोविड लस दिली जाणार नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
म्हणून गर्भवतींना नाही लस
कोरोनावरील लसीचे अजूनही परीक्षणच सुरू आहे. त्यामुळे त्याचे चांगले-वाईट परिणाम सध्या तरी समोर आलेले नाहीत. त्यामुळे या लसीचा परिणाम गर्भातील शिशुवर होतो किंवा नाही, हे स्पष्ट झालेले नाही. म्हणूनच गर्भवतींना लसीकरणापासून दूर ठेवण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
ॲलर्जी असल्यास लस नाही
कोरोनाची लस परीक्षणामध्ये असल्याने गर्भवतींसह ज्या व्यक्तीला ॲलर्जी आहे, अशांना लस दिली जाणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. हे लसीकरण संपूर्णत: ऐच्छिक आहे. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये इच्छुक असणाऱ्यांनाच लस दिली जाणार आहे.
कोरोनावरील लस पहिल्यांदाच दिली जाणार आहे. त्यामुळे गर्भवतींना सध्या लस दिली जाणार नसल्याच्या सूचना आहेत. लसीकरणाची तयारी पूर्ण झाली असून, लसीकरणासाठी आरोग्य विभाग सज्ज झाले आहे.
- डॉ. आरती कुलवाल, वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला
ॲलर्जी असल्यास त्यांनाही लस नाही