अकोला: जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी भारिप-बमसं आणि काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये प्राथमिक टप्प्यावर चर्चा झाली असून, पक्षाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांसोबत चर्चेनंतर पुढील टप्प्याची बोलणी केली जाईल, असे दोन्ही पक्षांतील संबंधितांनी सांगितले आहे. त्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी १४ जानेवारी रोजी मुंबईत बैठक बोलाविल्याचे काँग्रेस नेते सुनील धाबेकर यांनी सांगितले.जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भारिप-बमसंला २३ जागा मिळाल्या आहेत. दोन अपक्ष मिळून त्यांचे संख्याबळ २५ वर पोहोचले आहे. सत्ता स्थापनेसाठी २७ सदस्यांची गरज आहे. त्यासाठी सदस्यांची जुळवाजुळव करण्याला सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेसचे ४ सदस्य आहेत, तर राष्ट्रवादी सोबत आल्यास ती संख्या ७ होत आहे. या दोन्ही पक्षांच्या बळावर सत्ता स्थापन केल्यास भारिप-बमसंचे संख्याबळ ३२ वर पोहोचते. कोणत्याही एका पक्षाला सोबत घेतल्यासही बहुमत सिद्ध करता येते.भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे आणि काँग्रेसचे सुनील धाबेकर यांच्यात प्राथमिक चर्चा झाली. त्यावेळी सत्ता स्थापनेबाबत सकारात्मक असल्याचे संकेत मिळाले. त्यापूर्वी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीशी चर्चा केली जाईल. सत्ता स्थापनेबाबत माहिती दिली जाईल. त्यांच्या निर्णयानुसार सत्तेत सहभागी होण्याबाबत पुढील दिशा ठरणार आहे. त्यासाठी मंगळवारी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी बैठक बोलाविली आहे. काँग्रेसची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर पुढील बोलणी सुरू होईल, असे प्रदीप वानखडे यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेसाठी काँग्रेस-भारिपची प्राथमिक चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 2:11 PM