१ एप्रिलपासून होणार लागू: वर्ग-३ व ४ च्या कर्मचार्यांना होणार फायदाअकोला : महावितरणच्या वर्ग-३ आणि ४ च्या लाइन फोरमन, मुख्य तंत्रज्ञ, प्रधान तंत्रज्ञ, वरिष्ठ तंत्रज्ञ आणि तंत्रज्ञ आदी पदांसाठी १ एप्रिल २0१७ पासून मुदतपूर्व सेवानवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्मचार्याने वयाची ४५ वर्षे पूर्ण होणे अनिवार्य आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.जे तारमार्ग कर्मचारी आपली दैनंदिन कर्तव्ये आजारपण, अपघात आदी कारणांनी पार पाडू शकत नाही, अशा वर्ग-३ आणि वर्ग-४ च्या संवर्गासाठी मुदतपूर्व सेवानवृत्ती योजना लागू आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी वर्ग-३ मध्ये मोडत असलेल्या कर्मचार्याची वयोर्मयादा ४५ वर्षे पूर्ण आणि ५३ वर्षांपर्यंत असणे आणि वर्ग-४ साठी ४५ वर्षे पूर्ण आणि ५५ वर्षांपर्यंत असणे गरजेचे आहे. या योजनेत पात्र होण्यासाठी दैनंदिन कामे सुरळीत पार पाडू शकत नाही, अशा आशयाचे सिव्हिल सर्जनचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. जे कर्मचारी मुदतपूर्व सेवानवृत्ती त्यांच्या पाल्यासाठी ह्यविद्युत सहायकह्ण पदावरील नोकरी हा पर्याय शाबूत ठेवून घेत आहेत, त्यांचा पाल्य दहावी, बारावी उत्तीर्ण असणे अथवा दहावी, बारावीनंतर इलेक्ट्रिकल/वायरमनचा आयटीआय हा अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य व्यावसायिक परीक्षा मंडळांतर्गत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.जे कर्मचारी आपल्या पाल्यांना नोकरीचा पर्याय न ठेवता या योजनेचा लाभ घेऊ इच्छितात, त्यांना या योजनेनुसार सेवा झालेल्या प्रत्येक वर्षासाठी ३५ दिवसांचे वेतन आणि विहित सेवानवृत्ती पूर्वी राहिलेल्या प्रत्येक वर्षासाठी २५ दिवसांचे वेतन अशा सूत्रानुसार एकूण लाभ मिळणार आहे. हा लाभ एकूण जास्तीत जास्त १५ लाख रुपयांपर्यंतच राहील. कर्मचार्याच्या पाल्याच्या नोकरीसाठी या योजनेत पाल्याची वयोर्मयादा १८ ते २७ वर्षे (मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे शिथिल) अशी आहे. सदर योजनेचा लाभ १ एप्रिल २0१७ ते ३0 सप्टेंबर २0१७ या कालावधीतच घेता येणार असल्याचे महावितरण प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
महावितरणच्या कर्मचार्यांसाठी मुदतपूर्व सेवानवृत्ती योजना
By admin | Published: March 27, 2017 2:17 PM