अकोला : धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवानिमित्त विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी अकोल्यात धम्म मेळावा घेण्याची गेल्या ३८ वर्षाची परंपरा असून, कोरोना संकटाच्या दोन वर्षांनंतर यंदाही गुरुवार, ६ ऑक्टोबर रोजी आयोजित धम्म मेळाव्याची जय्यत तयारी पूर्ण करण्यात आली अली आहे. या मेळाव्यात राज्याच्या विविध जिल्ह्यातून आंबेडकरी अनुयायांचा जनसागर उसळणार असून, त्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार तथा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात मिळणाऱ्या संदेशाकडे अनुयायांचे लक्ष लागले आहे.
भारतीय बौद्ध महासभा अकोला जिल्हा शाखेच्यावतीने आयोजित अकोल्यातील धम्म मेळाव्याला अकोला जिल्ह्यासह वाशीम, बुलडाणा, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, औरंगाबाद, जालना, जळगाव खान्देश, अमरावती आदी राज्याच्या विविध जिल्ह्यातून आंबेडकरी अनुयायी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावत असतात. या पार्श्वभूमीवर अकोल्यातील अकोला क्रिकेट क्लब मैदानावर आयोजित धम्म मेळाव्याला हजेरी लावत बाळासाहेब आंबेडकरांचे विचार ऐकण्यासाठी आंबेडकरी अनुयायांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. त्यानुषंगाने धम्म मेळाव्याची जय्यत तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
मिरवणुकीची दणक्यात तयारीधम्म मेळाव्यापुर्वी दुपारी अकोल्यातील रेल्वे स्टेशनपासून शहरात भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीत भगवान गौतम बुद्ध, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा संदेश देणारे सचित्र देखावे लक्षवेधी ठरणार आहेत. लेझीम पथके, आखाडे, श्रामनेर संघ, समता सैनिक दल, बौद्ध उपासक, उपसिका संघासह आंबेडकरी अनुयायी मोठया प्रमाणात सहभागी होणार आहेत.शहरातील विविध मार्गावरून मार्गक्रमण करीत मिरवणुकीतीतील महामानवांच्या जयघोषाने अकोला शहर निनादनार आहे.