अकोला : जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी जिल्हा परिषदेचे ५३ गट आणि पंचायत समित्यांच्या १०६ गणांसाठी प्रवर्गनिहाय आरक्षणाची सोडत सोमवार, २७ आॅगस्ट रोजी काढण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ग्राम पंचायत निवडणूक विभागामार्फत आरक्षण सोडतीची तयारी सुरू करण्यात आली आहे.जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांच्या प्रभाग रचनेसह अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित जागांच्या प्रस्तावास विभागीय आयुक्तांकडून २० आॅगस्ट रोजी मान्यता देण्यात आली. त्यानुसार जिल्हा परिषदेचे ५३ गट आणि सात पंचायत समित्यांच्या १०६ गणांच्या प्रभाग रचनेला मान्यता देण्यात आली असून, जिल्हा परिषदेचे १२ गट अनुसूचित जातीसाठी आणि ५ गट अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले. तर सात पंचायत समित्यांचे २५ गण अनुसूचित जाती व ९ गण अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले. जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांसाठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण निश्चित करण्यात आले असले तरी, या दोन्ही प्रवर्गातील महिला तसेच नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील महिला व सर्वसाधारण प्रवर्गातील महिला इत्यादी प्रवर्गनिहाय आरक्षणाची सोडत २७ आॅगस्ट रोजी काढण्यात येणार आहे. त्यामध्ये जिल्हा परिषद गटांच्या आरक्षणाची सोडत सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आणि पंचायत समित्यांच्या गणांची आरक्षण सोडत संबंधित तहसील कार्यालयांमध्ये काढण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्हा परिषद गटांच्या आरक्षण सोडतीची जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्राम पंचायत निवडणूक विभागामार्फत तसेच पंचायत समिती गणांच्या आरक्षण सोडतीची तयारी सातही तहसील कार्यालयामार्फत सुरू करण्यात आली आहे.