तेल्हारा : सततच्या पावसामुळे खरीप हंगामाील सर्वच पिकांचे नुकसान झाले. कपाशी पिकाकडून शेतकऱ्यांना अपेक्षा असतानाच पहिल्याच वेचणीत बाेंडअळीने आक्रमण केल्यामुळे कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लागवड खर्चही निघत नसल्याने तेल्हारा तालुक्यातील काही शेतकरी कपाशी पिकावर रोटाव्हेटर फिरवून रब्बी हंगामाची तयारी करीत असल्याचे चित्र आहे.
सोयाबीन पाठोपाठ कपाशीचे पीकही तोट्यात आले आहे. वातावरणातील बदलाचा परिणाम आता तूर पिकावराही होऊ लागल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. बोंडअळीने आक्रमण केल्याने उत्पादनात घट होऊन एकरी ३ ते ५ क्विंटलच उत्पादन होत आहे. सरासरी एकरी कपाशीचे खर्च पाहता लागवडपूर्व नागरणी १००० रुपये, रोटाव्हेटर १००० रुपये, बियाणे १५०० रुपये, लागवड खर्च ४०० रुपये, डवरणी, रासायनिक खत, खत देणे मजुरी, निंदण, खुरपण, वेचणी असा एकूण एकरी खर्च ३२ हजारांपर्यंत जातो. मात्र उत्पादन ४ क्विंटल होत असल्याने १६ हजाराचे होत आहे. कापूस घरी आणणे, घरून बाजारात नेणे, ओलिताची मजुरी व शेतकऱ्याने घेतलेले कष्ट पाहता खर्चाचा आकडा मिळणाऱ्या उत्पन्नाच्या वर जातो, असे कापूस उत्पादक शेतकरी सांगतात. कपाशी पिकावर आशा, बोंडअळीमुळे निराशा झाल्याने काही शेतकरी कपाशीवर रोटाव्हेटर फिरवून रब्बीची तयारी करीत आहेत.
----------------------
कपाशीवर बोंडअळीचे आक्रमण वाढल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे रोटाव्हेटर फिरवून रब्बी हंगामात गहू, हरभऱ्याची पेरणी सुरू आहे.
- प्रमोद गावंडे, शेतकरी, तेल्हारा.
-----------------------------
तूर पिकावरही राेगराई
सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणाने तूर पिकाला फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे, बहुतांश शेतकरी हरभरा पिकाकडे वळले आहेत; पण खरिपातील सोयाबीन, कापूस या पाठोपाठ तूर पीकही शेतकऱ्यांना नापिकीकडे नेत असल्याने वार्षिक खर्च कसा करायचा, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. सोयाबीन पिकाचे सर्वेक्षण झाले; मात्र अद्यापही अनेकांना मदत मिळाली नसल्याचे चित्र आहे.