अकोला: स्वाइन फ्लू आजाराने जिल्हय़ात पुन्हा डोके वर काढले आहे. जिल्हय़ामध्ये स्वाइन फ्लूचे अनेक संशयित रुग्ण आढळून आले होते. स्वाइन फ्लू आजाराचा वाढता धोका लक्षात घेता, आरोग्य विभागाने स्वाइन प्लूच्या नियंत्रणासाठी तीन हजार वॅक्सिनसह (इंजेक्शन) टॅमी फ्लूच्या १ लाख २६ हजार गोळय़ा उपलब्ध केल्या आहेत. स्वाइन फ्लूसारख्या आजाराचे प्रस्थ वाढत असल्याने, आरोग्य विभाग सतर्क झाला. नागपूर, अमरावती, मुंबई, पुणे आदी भागामध्ये मोठय़ा प्रमाणात स्वाइन फ्लूचे संशयित रुग्ण आढळून आले आहेत. अकोला जिल्हय़ातसुद्धा स्वाइन फ्लूचे संशयित रुग्ण आढळून आले होते. या रुग्णांवर सर्वोपचार रुग्णालयात उपचार करण्यात आले. स्वाइन फ्लू आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभागाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले होते. तीन हजार वॅक्सिन (इंजेक्शन) उपलब्ध करून नागरिकांसह गर्भवती मातांना लसीकरण करण्यात येणार आहे. स्वाइन फ्लूच्या आजाराशी संबंधित औषधांचा तुटवडा असल्याने आरोग्य उपसंचालक कार्यालयाने राज्य शासनाकडे औषधांची मागणी केली होती. केलेल्या मागणीनुसार सोमवारी आरोग्य उपसंचालक कार्यालयाला तीन हजार वॅक्सिन आणि टॅमी फ्लूच्या १ लाख २६ हजार गोळय़ा प्राप्त झाल्या आहेत. या औषधांचे लवकरच वितरण करण्यात येणार असून, त्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, संबंधित आरोग्य विभागाकडून गरजेनुसार औषधांचे विवरण मागविण्यात आले आहेत.
स्वाइन फ्लूच्या नियंत्रणासाठी यंत्रणा सज्ज
By admin | Published: October 07, 2015 2:07 AM