अमरावतीत १७ कोटीनंतर आता तीन कोटींचा घोटाळा अकोला: बडनेरा गोदामातून हजारो क्विंटल धान्य गायब झाल्याचा चौकशी अहवाल भारतीय खाद्य निगमच्या मुंबई कार्यालयात सादर करण्यात आला आहे. अपहारित धान्याची रक्कम वसुलीची कारवाई येत्या आठवड्यात होणार आहे. तीन वर्षापूर्वी अकोला, अमरावती जिल्ह्यातील गोदामातून २१ कोटींचे धान्य गायब झाल्यानंतर आता तीन कोटींपेक्षाही अधिक रकमेच्या धान्याचा अपहार झाल्याची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यात भारतीय खाद्य निगमच्या वतीने धान्य वाटप करण्यासाठी केंद्रीय वखार महामंडळाने बडनेरालगत दाभा येथे रेणुका वेअर हाउसचे गोदाम भाड्याने घेतले. त्या गोदामातून गेल्या काही महिन्यांत गहू आणि तांदळाच्या हजारो बॅगा गायब झाल्याचे वृत्त ह्यलोकमतह्णने लावून धरले. त्यानंतर गोदामातील गहू आणि तांदूळ मिळून तब्बल २३ हजार बॅगा गायब झाल्याचे पुढे आले. त्याची बाजारातील किंमत तीन कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे. ही चौकशी करण्यासाठी महिनाभर टाळाटाळ करण्यात आली. २ फेब्रुवारी रोजी खाद्य निगमच्या अधिकाऱ्यांनी बडनेरा गोदामात चौकशी केली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी ही नेहमीची भेट असल्याचे सांगत वेळ मारून नेली होती. त्यानंतर भारतीय खाद्य निगमच्या वर्धा येथील व्यवस्थापक नायक, यवतमाळ येथील सहायक खान यांना चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. त्यांच्या पथकाने चौकशी करून तसा अहवाल नागपूर येथील विभागीय कार्यालयात सादर केला. त्या कार्यालयाने भारतीय खाद्य निगमच्या मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयातही पाठवला; मात्र त्यावर पुढील कार्यवाही करणारे सहायक उपमहाप्रबंधक दिल्ली येथे प्रशिक्षणासाठी असल्याने प्रस्ताव तयार झालेला नाही. बुधवारनंतर तो तयार होण्याची शक्यता आहे. प्रादेशिक व्यवस्थापकांच्या आदेशाने केंद्रीय वखार महामंडळाकडून अपहारित धान्याची रक्कम वसूल होण्याची शक्यता आहे. त्यानुसार रेणुका वेअर हाउसच्या व्यवस्थापनाकडून ती वसूल होणार आहे, असे भारतीय खाद्य निगमचे मुंबई येथील उपमहाव्यवस्थापक एस.जी. टेंभुर्णे यांनी सांगितले. - २१ कोटींचा धान्याचा अपहार विशेष म्हणजे, तीन वर्षांपूर्वी अकोला, अमरावती येथे भारतीय खाद्य निगमने धान्य साठा करण्याचे काम दिलेल्या केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामातून तब्बल २१ कोटी रुपयांच्या धान्याचा अपहार झाल्याचे पुढे आले होते. त्यापैकी ३ कोटी २७ लाख रुपयांचा अपहार अकोल्यातील होता. ती संपूर्ण रक्कम खाद्य महामंडळाने वसूल केली. त्यासोबतच सर्व संबंधितांवर फौजदारीही करण्यात आली. अकोल्यातील प्रकरण तर सीबीआयकडे आहे. आता बडनेरा प्रकरणात फौजदारी होण्याची शक्यता आहे.
धान्य घोटाळ््याचा चौकशी अहवाल तयार
By admin | Published: March 19, 2017 7:47 PM