अकोला: जिल्ह्यातील जनसामान्यांच्या आरोग्यासाठी रविवार, ३० डिसेंबर रोजी अकोल्यातील शास्त्री स्टेडियम येथे महाआरोग्य रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी २० हजार लोकांची नोंदणी करण्यात आली असून, शिबिराची तयारी पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शुक्रवारी दिली. गेल्या चार वर्षातील जिल्ह्यातील विकासकामांचा लेखा-जोखाही पालकमंत्र्यांनी यावेळी मांडला.शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सर्वांसाठी विनामूल्य महाआरोग्य शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत विविध आजारांच्या तपासणीसह चाचण्या, औषधोपचाराच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्यावतीने आयोजित या शिबिरात सरकारी आणि विविध खासगी रुग्णालयांच्या तज्ज्ञ डॉक्टरांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. तसेच दुर्धर आजारांचे निदान झालेल्या रुग्णांना मुंबई येथील रुग्णालयांत उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महाआरोग्य शिबिरात ३० बाह्य रुग्ण स्टॉल्स राहणार असून, सर्व प्रकारच्या तपासण्या करण्यात येणार आहेत, असे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगीतले. गत चार वर्षातील जिल्ह्यातील विविध विकासकामांची माहिती त्यांनी यावेळी दिली. त्यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांची कामे मार्गी लागली असून, घुंगशी प्रकल्पासाठी पंपहाऊस व बंद पाइपलाइनचे डिझाइन प्राप्त झाले आहे. तसेच नेरधामना, कवठा बॅरेज, अंदुरा प्रकल्पाचे कामही लवकरच पूर्ण होणार आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून, यंत्रसामग्री खरेदीसाठी लवकरच निविदा काढण्यात येणार आहे. सांस्कृतिक भवनाचे काम पूर्णत्वास आले असून, अतिरिक्त सुविधांसाठी १५ कोटींचा निधी प्राप्त झाला. जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीमध्ये फर्निचरसाठी साडेचार कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. न्यू तापडिया नगर येथील रेल्वे उड्डाण पुलाच्या कामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगत इतर विकासकामांची माहिती पालकमंत्र्यांनी दिली. यावेळी माजी आमदार वसंतराव खोटरे, डॉ. जगन्नाथ ढोणे उपस्थित होते.‘नेकलेस रोड’चे काम मार्गी; पासपोर्ट कार्यालय चार महिन्यात!शहरातील वर्दळीच्या ‘नेकलेस रोड’चे काम मार्गी लागले असून, या रस्त्यावरील भूमिगत वीज वाहिनी टाकण्यात येणार आहे. तसेच अकोल्यात पासपोर्ट कार्यालयाचे काम चार महिन्यात पूर्ण करण्यात येणार असल्याचे डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले.