सर्वोपचार रुग्णालयात सद्यस्थितीत कोविड रुग्णांसाठी ४५० खाटा राखीव आहेत, मात्र गत महिनाभरात येथे दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्या तुनलेत उपलब्ध मनुष्यबळ कमी पडत असून, खाटाही अपुऱ्या पडत आहे. परिणामी येथे दाखल होण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना खाटांसाठी तास दीड तासांची प्रतीक्षा करावी लागत आहे. कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सर्वोपाचर रुग्णालयात कोविडसाठी १०० खाटा वाढविण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती आहे. यापैकी ६० खाटा जुना बालरोग विभागात, तर उर्वरीत ४० खाटांची व्यवस्था इतर वॉर्डांमध्ये प्रस्तावीत आहे. त्यासाठी आवश्यक सेंट्रल ऑक्सिजनच्या ५० खाटा, जवळपास १०० गाद्या आणि १०० जम्बो ऑक्सिजन सिलिंडरची मागणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनातर्फे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे करण्यात आली आहे. ही मागणी वेळेत मान्य झाल्यास सर्वोपचार रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी आणखी १०० खाटांची व्यवस्था होणार आहे. म्हणजेच सर्वोपचार रुग्णालयात कोविडसाठी ५५० खाटा राखीव असणार आहेत.
मनुष्यबळाचा प्रश्न गंभीर
सर्वोपचार रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातुलनेत येथील उपलब्ध मनुष्यबळ कमी पडत आहे. त्यामुळे उपलब्ध वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवरील ताण वाढला आहे. संभाव्य परिस्थिती लक्षात घेता सर्वोपचार रुग्णालयात आणखी १०० खाटा वाढविण्याचे नियोजन केले जात आहे. त्यामुळे येणारा काळ आणखी तणावपूर्ण ठरू शकतो. ही बाब लक्षात घेता जीएमसी प्रशासनातर्फे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे कंत्राटी मनुष्यबळाची मागणी करण्यात आल्याची माहिती आहे.
कनिष्ठ निवासी डॉक्टरांची नियुक्त
कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनातर्फे कनिष्ठ निवासी डॉक्टरचीां नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे रुग्णसेवेचा थोडा आधार मिळाला असला, तरी वाढत्या रुग्णसंख्येमुळे ताण आणखी वाढणार आहे.