लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना संसर्गाच्या काळात ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेसह खासगी व्यवस्थापनांच्या शाळा सुरू करण्याची तयारी शिक्षण विभागाने सुरू केली आहे. त्यासाठी १८ मुद्यांची माहिती घेत नियोजन केले जाणार आहे. त्यासाठी केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांची माहिती ११ जूनपर्यंत मागविण्यात आली आहे.जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने २०२०-२१ या वर्षासाठी शाळा सुरू करण्याचे नियोजन सुरू केले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता शाळा सुरू करण्यात अडचणी आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोणत्या शाळा, कशा स्वरूपात सुरू करता येतील, याची माहिती घेऊन त्यानुसार नियोजन होणार आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्यासह खासगी व्यवस्थापनांच्या शाळांची माहिती घेतली जात आहे. शिक्षण विभागाने ८ जून रोजी पाठविलेल्या पत्रात गटशिक्षणाधिकाऱ्यांंनी ११ जूनपर्यंत मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांकडून माहिती घ्यावी, त्यानंतर १२ जून रोजी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे माहितीसह अहवाल सादर केला जाणार आहे. त्या अहवालातील माहितीनुसार शाळा सुरू करण्याचे नियोजन करून त्या पद्धतीने शाळा सुरू होतील, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.शिक्षण विभागाच्या म्हणण्यानुसार विविध १४ मुद्यांची माहिती मागवण्यात आली. त्यामध्ये नियमित पूर्ण वेळ सुरू करावयाच्या शाळा किती आहेत, नियमित अर्धवेळ सुरू करावयाच्या शाळा, एक दिवसाआड पूर्ण वेळ सुरू करावयाच्या शाळा, एक दिवसाआड पूर्ण वेळ सुरू करावयाच्या शाळा, शाळेतील सर्व विद्यार्थी आॅनलाइन अध्यापन करू शकतील अशा शाळांची संख्या, एकूण पटसंख्येपैकी काही विद्यार्थी आॅनलाइन अध्यापन करू शकतील अशा शाळा, दोन शिफ्टमध्ये सुरू करता येतील अशा शाळा, काही विद्यार्थी आॅनलाइन तर काही शाळेत राहून अध्यापन करू शकतील अशा शाळा, फक्त रेडिओच्या माध्यमातून विद्यार्थी अध्यापन करू शकतील अशा शाळा, फक्त टीव्हीच्या माध्यमातून विद्यार्थी अध्यापन करू शकतील अशा शाळा, काही विद्यार्थी रेडिओ तर काही टिव्हीच्या माध्यमातून अध्यापन करू शकतील अशा शाळा, आॅनलाइन, टीव्ही, रेडिओच्या माध्यमातून अध्यापन करू शकतील, अशा शाळा, कोविड-१९ रोग प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये नियुक्त केलेले शिक्षक, अलगीकरणासाठी वापरात असलेल्या शाळा, तंत्रस्नेही शिक्षकांची संख्या, तालुक्याची एकूण संभाव्य विद्यार्थी संख्या, याबाबतच्या संपूर्ण माहितीवरून शिक्षण विभागाचे नियोजन ठरणार आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू करण्याची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 10:20 AM