----
जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात
पारस : येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी कन्या शाळा व मुलांच्या शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कन्या शाळेत शाळेचे मुख्याध्यापक गजानन करांगळे यांच्या हस्ते तर मुलांच्या शाळेत मुख्याध्यापिका प्रणोती सोनचळ यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर सर्व उपस्थितांना तंबाखू मुक्तीची शपथ देण्यात आली. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्या तथा शिक्षण समिती सदस्या आम्रपाली खंडारे यांच्या हस्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तर पारस ग्रामपंचायतचे सरपंच संतोष साठे यांच्या हस्ते भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे प्रणेते राष्ट्रपिता महात्मा गांधींजींच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी कन्या शाळेची विद्यार्थिनी सिद्धी पुंडे हिने भारतमातेची वेषभूषा साकारली होती. उपस्थितांनी तिचे स्वागत केले. यावेळी कन्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भगवान तयकर, मुलांच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सुरेखा कळम तसेच सर्व उपस्थितांच्या हस्ते प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सचिन तायडे, नितीन लांडे, शिवशंकर कडू , विनोद लांडे, शेख अजहर शेख कय्युम, शेख ख्वाजा, तसेच मोहम्मद जफर, दोन्ही शाळेतील शिक्षक विभूती हाडोळे, विजय अहिर, प्रीती झापर्डे, सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस व इतर गावकरी उपस्थित होते. यावेळी कोरोना नियमांचे पालन करण्यात आले.