पातूर तालुक्यात तुरळक पावसाची हजेरी
पातूर : तालुक्यातील ग्रामीण भागात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. मेघगर्जना आणि गारपिटीची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या भाजीपालावर्गीय तथा गहू, कांदा, आंबा यासोबतच लिंबू, संत्रा आधी प्रकारच्या फळबागा शेतामध्ये डोलत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण कायम असून, जोरदार पावसाची शक्यता गारपिटीसह व्यक्त केली जात आहे. गेला आठवडा कृषी पंपांची वीज तोडणी यामध्ये गेल्याने शेतकरी सुलतानी संकटात अडकला होता; मात्र दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
---------------------------------------
दिग्रस बु. परिसरात लिंबू पिकाचे नुकसान
दिग्रस बु. : दिग्रस बु. परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने लिंबू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दिग्रस बु. परिसरात शेतकरी लिंबूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतात. मात्र शुक्रवारी अचानक आलेल्या पावसाने लिंबू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यंदा परिसरात कांदा, गहू, हरभरा, भाजीपाला वर्गीय पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली होती. मात्र अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. परिसरात काही शेतकऱ्यांचा हरभरा सोंगणीसाठी आला होता. ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्याने सोंगणीची घाई केली; मात्र सायंकाळी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.