लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हय़ातील पाणीटंचाई निवारणाचा परिपूर्ण कृती आराखडा तातडीने सादर करून मान्यता घेण्याचे निर्देश प्रभारी अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी मंगळवारी अधिकार्यांच्या बैठकीत दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. महानगरपालिका, नगरपालिका व जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने पाणीटंचाई निवारणासाठी उपाययोजनांचा समावेश असलेला परिपूर्ण कृती आराखडा तातडीने सादर करून मार्च २0१८ पूर्वी पाणीटंचाई परिस्थिती निवारणासाठी काटेकार नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जिल्हय़ातील ग्रामीण भागातील गावनिहाय आणि शहरी भागाचा वॉर्डनिहाय पाणीटंचाई निवारणासाठी उपाययोजनांचा सविस्तर कृती आराखडा तयार करून संबंधित विभागाची मान्यता तातडीने घेण्याचे निर्देशही प्रभारी अपर जिल्हाधिकारी खवले यांनी दिले. या बैठकीला उपविभागीय अधिकारी संजय खडसे, भगवान सैंदाणे, उपजिल्हाधिकारी अभयसिंह मोहिते यांच्यासह महानगरपालिका, जिल्हय़ातील नगरपालिका महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पाटबंधारे व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
‘टँकर’साठी निविदा; चार्याचे नियोजन करा!पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याकरिता निविदा प्रक्रिया पूर्ण करून जनावरांसाठी चार्याबाबत नियोजन करण्याच्या सूचनाही अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी संबंधित अधिकार्यांना दिल्या.