तालुक्यात सध्या रेतीचा अवैध व्यवसाय जोरात सुरू असून, त्यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी स्वतः तहसीलदार राजेश गुरव रस्त्यावर उतरले आहेत. तहसीलदारांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी ते वांगरगाव शेतशिवारात शासकीय वाहनाने फिरत असताना ट्रॅक्टर (क्र. एमएच ३० बीबी ३२६४) रेतीची वाहतूक करताना आढळून आले. ट्रॅक्टर राजेश खारोडे याच्या मालकीचे आहे. ट्रॅक्टरविरुद्ध कारवाई करताना तहसीलदार गुरव यांच्यावर काही लोकांनी दबावतंत्राचा वापर केला. त्यांच्यावर दबाव टाकण्याचे बरेच प्रयत्न केले; परंतु तहसीलदारांनी दबावाला बळी न पडता कारवाई केली.
कारवाई टाळण्यासाठी रेती केली खाली
वाहनात रेती नसल्याचे दाखविण्यासाठी वाहनातील रेती खाली करण्यात आली; परंतु तहसीलदारांनी दबावाला बळी न पडता कारवाईचा बडगा उगारल्यानंतर ट्रॅक्टर व ट्रॉलीमध्ये पुन्हा रेती भरण्यात आली. तहसीलदारांनी, पोलिसांना पाचारण करून वाहन पोलीस स्टेशनमध्ये जमा केले. सदर वाहनावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले.