सावरगाव येथील अल्पभूधारक शेतकरी काशीराम पवार यांचे शेत सर्व्हे नंबर १५७/१ सावरगाव शिवारात आहे. २०२० साली रस्त्यावरून वाद सुरू होता. याबाबत गणेश जयसिंग चव्हाण यांनी सरकारी मोजणी अधिकाऱ्याकडे अर्ज केला होता. मोजणीच्या वेळी मोजणी विभागाचे अधिकारी कुलसंगे, दिलीप बोडदे, नायब तहसीलदार सय्यद एहसानोद्दीन, मंडळ अधिकारी विजय राठोड, सरपंच गजानन बलक यांच्या उपस्थितीत २४ जून २०२० रोजी मोजणी केली. मोजणीमध्ये वादाच्या भोवऱ्यात असलेला रस्ता काशीराम पवार यांच्या ताब्यात दिला होता. शिवाय अर्जदार गणेश चव्हाण यांची यानंतर कोणतीच तक्रार राहणार नाही, असे मोजणी विभागाच्या अधिकाऱ्यांनी लिहून घेतले होते; परंतु काशीराम पवार याला कुठल्याही प्रकारची तोंडी किंवा लेखी पूर्वकल्पना न देता, मंडळ अधिकारी विजय राठोड यांनी २७ मे रोजी मोजणी झालेल्या शेतात जाऊन रस्ता मोकळा करण्याचे तोंडी आदेश देऊन धमकी देऊन प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शेतकरी काशीराम पवार यांनी पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीतून केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी तहसीलदारांना दिले आहेत.
मोजणी झालेल्या शेतात अतिक्रमण केल्याचा बनाव फसला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2021 4:14 AM