अकोला : बाळापूरात १५० पेक्षाही अधिक विटभट्ट्या अवैध असताना त्याचवेळी कुंभार समाजाच्या व्यक्तीला वीट पजावा सुरू करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून परवानगी दिली जात नसल्याचा प्रकार तहसीलमध्ये घडत आहे. याप्रकरणी चौकशी करून बाळापूर तहसीलदारांवर कारवाई करण्याची मागणी मनोज बनचरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे शुक्रवारी केली आहे.मातीपासून विटा तयार करणे, हा कुंभार समाजाचा पिढीजात व्यवसाय आहे. सुशिक्षित बेरोजगार असल्याने पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेतून ९.५ टक्के व्याजदराने ४ लाख २५ हजार कर्ज घेतले. त्यातून विटभट्टी लावण्यासाठी तहसीलदारांकडे अर्ज केला. त्यामध्ये बाळापूर जवळच्या बाभूळखेड येथील जागेचा नकाशा दिला. माती उत्खननासाठी हाता येथील शेतकºयाचे संमतीपत्र दिले. तसेच व्यवसाय कर भरण्यासह इतरही दाखले अर्जासोबत दिले. ४ जानेवारी २०१९ रोजी केलेल्या अर्जानुसार अद्यापही वीटभट्टीसाठी परवानगी देण्यात आलेली नाही. त्याचवेळी बाळापूर शहरालगत १५० पेक्षाही अधिक वीटभट्ट्या अवैधपणे सुरू आहेत. विशेष म्हणजे, कुंभार समाजाला मातीची स्वामित्वधन रक्कम भरण्यापासून सुट देण्यात आली आहे. ती सवलत देण्यातही टाळाटाळ केली जात आहे. स्वामित्त्वधनातून सुट असलेली माती उत्खननाची परवानगी मिळत नसल्याने माती विकत घ्यावी लागते. सोबतच फ्लाय अॅश विकत घ्यावी लागते. त्याचा प्रचंड खर्च आहे. त्यामुळे बेरोजगार व्यक्तीचे नुकसान होत आहे. याप्रकरणी चौकशी करून तहसीलदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी बनचरे यांनी निवेदनात केली आहे.