अकोला: उष्णतेचा धोका लक्षात घेता जिल्हादंडाधिकारी अजित कुंभार यांनी जिल्ह्यात ३१ मेपर्यंत कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केली आहे. हा आदेश त्यांनी शनिवार, २५ मे २०२४ रोजीपासून लागू केला आहे. प्रादेशिक हवामान विभागाच्या नागपूर येथील कार्यालयाचा संदेश २५ मे २०२४ रोजी प्राप्त झाला. त्यानुसार २५ ते ३१ मे पर्यंत उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४४ ते ४५.८ अंश सेल्सियसपर्यंत आहे.
उष्माघातामुळे सामान्य नागरिक, कामगार, विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, यासाठी कामगारांना सेवा पुरवणे, खासगी क्लासेसच्या वेळेत बदल करणे व अन्य उपाय योजना प्रभावीपणे राबवणे आवश्यक असल्याचे जिल्हादंडाधिकारी अजित कुंभार यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे २५ मे रोजीच्या दुपारी ४पासून ते ३१ मेपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम १४४ चे आदेश करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.
जिल्हा दंडाधिकारी कुंभार यांनी दिलेल्या आदेशानुसार अंगमेहनत करणारे कामगार आणि औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांकडून उन्हात काम करून घेता येणार नाही. कामाच्या ठिकाणी उष्माघातापासून संरक्षासाठी पुरेसे शेड तयार करणे, पंखे, कुलर किंवा अन्य साधनांची व्यवस्था, पिण्याचे पुरेसे पाणी व प्रथमोपचार पेटी ठेवणे, याची जबाबदारी संबंधित आस्थापना मालकाची राहणार आहे.
याबाबत काही तक्रार असल्यास संबंधित ग्राम पंचायत, महानगरपालिका, नगर परिषद, पोलिस प्रशासन, कामगार कल्याण विभागाकडे तक्रार करता येईल. खासगी शिकवणी वर्गाच्या संचालकांनी सकाळी १० वाजतापर्यंत व सायंकाळी ५ नंतर कोचिंग सेंटर चालवावेत. सकाळी १० ते ५ वेळेत क्लास सुरु ठेवायचे असल्यास तेथे पंख, कुलर किंवा अन्य साधनांची व्यवस्था करण्याची जाबबदारी संबधित क्लासच्या संचालकांची राहणार आहे, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.