अकोला : गणरायापाठोपाठ दाखल होणाऱ्या महालक्ष्मींच्या स्वागतासाठी घराघरांत महिलांची लगबग सुरू झाली आहे. गौरींचे वैविध्यपूर्ण मुखवटे, असंख्य प्रकाराचे दागिने, साड्या आणि सजावट साहित्यांनी सजलेल्या बाजारपेठांमध्ये सध्या महिलांची वर्दळ बघायला मिळते आहे; परंतु यंदा वाहतूक खर्च व इतर साहित्य महागल्याने मुखवट्यासोबत इतर साहित्याच्याही किमती वाढल्या आहे. त्यामुळे मागणी घटल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. 'ज्येष्ठा आणि कनिष्ठा या गौरींसाठी कुड्या, ठुशी, मंगळसूत्र, मोहनमाळ, बांगड्या, मोत्याच्या माळा, नथ, बुगडी, जोडवी अशा पारंपरिक आभूषणांसह खास डिझायनर प्रकारच्या साड्याही उपलब्ध आहेत. मंगळसूत्रातही विविध प्रकार आहेत. हे दागिने साधारण २०० रुपयांपासून पुढे तीन हजारांपर्यंत विविध दरांमध्ये विक्रीसाठी ठेवले आहेत. पाचवारी आणि नऊवारी या दोन्ही प्रकारात रेडिमेड साड्या विक्रेत्यांनी आणल्या आहेत,' अशी माहिती विक्रेत्यांनी दिली. साडी ते मुखवट्यापर्यंतचा पूर्ण सेटही मिळत आहे. कोरोना काळात नागरिकांच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहे. त्यात डिझेल, पेट्रोलच्या किमती वाढल्याने महालक्ष्मींचा मुखवटा व इतर साहित्यांच्या किमती वाढल्या आहे.
विक्रेते म्हणतात...
दरवर्षीप्रमाणे यंदाही बुलडाणा, औरंगाबाद, वाशीम जिल्ह्यांतून ग्राहक महालक्ष्मी उत्सवाचे साहित्य खरेदीसाठी येत आहेत. परंतु. यावर्षी ग्राहक कमी प्रमाणात दिसून येत आहेत. मुखवटा व सजावटीच्या साहित्याची मागणी अधिक आहे.
- प्रवीण मांडेकर
आतापर्यंत बहुतांश मालाची विक्री झालेली असते. परंतु, यावर्षी ग्राहकांकडून मागणी कमी आहे. त्यामुळे नवीन मुखवटे व इतर साहित्यदेखील कमी प्रमाणात तयार करण्यात आले आहे. वाहतूक खर्च वाढल्याने दरही वाढले आहेत.
- सौरभ खेडकर
पीओपी मुखवट्याला पसंती
शहरात गौरी साहित्य विक्रीची १२-१५ दुकाने आहेत. या ठिकाणी पीओपी व फायबर या दोन्ही प्रकारांचे मुखवटे विक्री केले जात आहेत. मात्र, यातील पीओपीच्या मुखवट्याला सर्वाधिक पसंती असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
या ठिकाणाहून येतात रेखीव, सुबक मुखवटे
अकोला शहरात काही स्थानिक कारागीर महालक्ष्मी उत्सवासाठी मुखवटे तयार करतात; परंतु शहरात पेन, सोलापूर, पुणे येथून आलेल्या मुखवट्यांना मागणी आहे. हे मुखवटे रेखीव, सुबक राहत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. तसेच २१००-७५०० रुपयांपर्यंत यांची विक्री होते.
आज ज्येष्ठा गौरी आवाहन
भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात आपापल्या कुलाचाराप्रमाणे महालक्ष्मी-गौरी बसवितात. ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर महालक्ष्मीचे विसर्जन करतात. यंदा शुक्रवारी गणपती बाप्पाचे आगमन झाले आणि रविवारी गौराई घरोघरी दाखल होणार आहे.