अकोला : दोन हजार रुपयांपर्यंत खाली उतरलेले सरकी ढेपीचे भाव पुन्हा उसळून क्विंटलमागे अडीचशे रुपयांनी वाधरले आहे. सरकी ढेपीत पुन्हा तेजी येत असल्याने पशुपालकांमध्ये तीव्र नाराजी नोंदविली जात आहे.कापसाला बऱ्यापैकी भाव मिळत असताना अवकाळी पावसाने कापसाची आवक थांबल्याने त्याचा परिणाम कापसापासून निघणाºया ढेपीवर पडला आहे. परिणामी गत आठ दिवसांत सरकी आणि सरकीपासून तयार होत असलेल्या ढेपीचे भाव वधारले आहे. आठ दिवसांआधी सरकी ढेपीचे भाव २ हजार रुपये क्विंटलपर्यंत पोहोचले होते. यामध्ये अडीचशे रुपयांची वाढ झाली आहे. आता सरकी ढेप २,३०० रुपये प्रती क्विंटलच्या दराने विकल्या जात आहे. आठ दिवसांत अचानक सरकी ढेपीचे भाव वधारल्याने पशुपालक त्रासला असून, दुधाच्या दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सरकी ढेपीच्या भावावाढीमागे एनसीडीईएक्सवरील सटोडियेची खरेदी-विक्री असल्याचे बोलले जात आहे. मागेदेखील याच पद्धतीने सरकी ढेपीचे भाव वधारत ४ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले होते. त्याच दरम्यान पशुपालकांनी ढेप दरवाढीचा निषेध नोंदवित दुधाच्या दरात वाढ केली. दूध संघाने दुधाच्या दरात वाढ करताच दूध कंपन्यांनीदेखील दरात वाढ केली. ही दरवाढ झाल्यानंतर सरकी ढेपीचे भाव ४ हजारांहून घसरून पुन्हा दोन हजाराच्या घरात आले; मात्र दुधाचे भाव मात्र वाढीवच आहे. यात सर्वसामान्य ग्राहकांची प्रचंड लूट होताना दिसत आहे. सरकी ढेपीच्या भावावर तातडीने नियंत्रण आणण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया याआधीच अकोल्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या असल्या तरी याकडे कुणाचेही लक्ष नाही.