शहर वाहतूक शाखेच्या महिला कर्मचाऱ्यांना एक दिवसाची सुटी
आगळा-वेगळा महिला दिन साजरा
अकोला : मागील एक वर्षापासून शहर व जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी जास्त प्रमाणात सुरू आहे. मागील वर्षी २२ मार्चपासून संपूर्ण भारतात लॉकडाऊन लावण्यात आला. अकोल्यात सुद्धा कडक लॉकडाऊन असताना वाहतुक शाखेतील महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस कडेकोट ड्युटी बजावली. त्यामुळे महिला दिनानिमित्त या महिलांना एक दिवसाची सुटी देऊन वाहतूक शाखेत आगळावेगळा महिला दिन साजरा करण्यात आला. या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा गौरवही यावेळी करण्यात आला.
शहर वाहतूक शाखेवर रस्त्यावरील संचारबंदी प्रभावीपणे राबविण्याची जबाबदारी असल्याने शहर वाहतूक शाखेचा एकूण एक कर्मचारी रस्त्यावर कोरोना काळात उभा राहिला. अशातच वाहतूक शाखेच्या महिला अंमलदारांवर मोठी जबाबदारी येऊन पडली. कुटुंब, लहान मुले, पती ह्यांच्या जबदरीसह स्वतः ला कोरोना पासून वाचविण्याचे मोठे आवाहन ह्या महिलावर्गापुढे उभे होते. परंतु घरी दुधपिते सहा महिने ते एक वर्षाची छोटी छोटी बालके घरी ठेवून या महिला वर्गाने चोखपणे कर्तव्य बजावले. सध्याचे कोरोनाचे पार्श्वभूमीवर सुद्धा शहर वाहतूक शाखेच्या महिला अंमलदार सेवा बजावीत आहेत. त्यांचे या कार्याची दखल घेऊन ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या महिला अंमलदारांचा सत्कार केला व त्यांना एक दिवसाची सुटी देऊन त्यांचे प्रति कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी शहर वाहतूक शाखेच्या महिला अंमलदार नीता संके, दीपाली नारनवरे, पूजा दांडगे, वैशाली रणवीर, अश्विनी माने यांचा गौरव करण्यात आला.