हिवरखेड : अडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या चितलवाडी येथील उपकेंद्रात आरोग्यसेविकाचे पद रिक्त असल्याने हे उपकेंद्र नेहमी बंद असते. उपकेंद्र बंद असल्याने परिसरातील रुग्णांची गैरसोय होत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन आरोग्यसेविकेचे पद भरण्याची मागणी होत आहे.
गत काही दिवसांपासून चितलवाडी उपकेंद्रात आरोग्यसेवा नसल्यामुळे रुग्ण त्रस्त झाले आहेत. चितवाडी येथील आरोग्य उपकेंद्रात परिसरातील बोरवा, नयाखेडा, सोमठाणा, नवी तलाव आदी गावांतील रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र, उपकेंद्र बंद असल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी जावे लागत आहे. परिणामी, गोरगरीब रुग्णांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. येथील आरोग्यसेविकेची बदली झाली असून, अद्यापपर्यंतही हे पद रिक्त आहे. अतिरिक्त प्रभार पाथर्डी येथील आरोग्यसेविकेकडे देण्यात आला; परंतु त्यासुद्धा आठवड्यातून दोन दिवसच उपलब्ध असतात, अशी आरोग्य विभागाने माहिती दिली. कोरोनाच्या संकट काळात रुग्णांना सेवा मिळण्यासाठी येथील पद त्वरित भरण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
------------------------
गत काही महिन्यांपासून आरोग्य उपकेंद्रामध्ये आरोग्यसेविकेचे पद रिक्त असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आरोग्य विभागाने रिक्त पद त्वरित भरावे, अशी मागणी करीत पत्र दिले आहे.
-गजानन नांदूरकर, सरपंच, चितलवाडी
-------------------------------
आरोग्य विभागाकडून रिक्त जागा भरल्यानंतर उपकेंद्रांमध्ये आरोग्यसेविका हे पद भरण्यात येईल.
-प्रवीण चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी, तेल्हारा