अकोला: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे मासिक वेतन दर महिन्याच्या १ तारखेला होणे अपेक्षित आहे; परंतु ढिम्म जिल्हा परिषदेच्या प्रशासनामुळे प्राथमिक शिक्षकांना १ तारखेला वेतन तर सोडाच, दोन-दोन महिन्यांपर्यंत वेतन मिळत नसल्याची व्यथा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने (प्राथमिक) पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याकडे मांडली. पालकमंत्र्यांनी याबाबतील जिल्हाधिकाऱ्यांना लक्ष घालण्याचे निर्देश दिले आहेत.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे मागील अनेक महिन्यांपासून वेळेवर वेतन होत नसल्याने आर्थिक कुंचबणा होत आहे. जिल्हा परिषद प्रशासन शिक्षकांना वेळेवर वेतन देण्यास जाणीवपूर्वक दिरंगाई करीत असल्याचा आरोप शिक्षक परिषदेने केला आहे. शिक्षकांना दोन-दोन महिन्यांनंतर वेतन देण्यात येते. वेतन उशिराने मिळत असल्यामुळे शिक्षक परिषदेने याबाबत अनेकदा प्रशासनाकडे तक्रारीसुद्धा केल्या, निवेदने दिली. तसेच यासंदर्भात धरणे आंदोलनसुद्धा केले; परंतु जिल्हा परिषद प्रशासन प्राथमिक शिक्षकांच्या समस्येची दखल घ्यायला तयार नाही. आॅगस्ट महिन्याचे वेतन अद्याप पंचायत समिती स्तरावर पोहोचले नाही. त्यामुळे शिक्षकांना दर महिन्याला त्रास सहन करावा लागत आहे. प्राथमिक शिक्षकांची ही समस्या मार्गी लावावी, अशी मागणी शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश चतरकर, कार्याध्यक्ष श्याम कुलट, कार्यवाह सचिन काठोळे, नितीन बंडावार यांनी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याकडे केली आहे. त्यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाºयांना आदेश देऊन योग्य कार्यवाही करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. (प्रतिनिधी)