लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : प्राथमिक शाळांमध्ये शिकविणार्या शिक्षकांना शैक्षणिक पात्रतेनुसार बढती मिळणार असल्याची चर्चा शिक्षण खात्यात सुरू आहे. शिक्षकांना शैक्षणिक पात्रतेनुसार बढती देण्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरू आहे. २९ डिसेंबरपासून अर्जसुद्धा स्वीकारले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे; परंतु याबाबत प्राथमिक शिक्षण विभागाने मात्र कानावर हात ठेवले असून, याबाबत कोणतीही माहिती अद्यापपर्यंत शिक्षण विभागाकडे पोहोचली नसल्याचे सांगण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्राथमिक शिक्षकांची बढती प्रक्रिया सुरू होणार असून, प्राथमिक शिक्षकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार बढती दिली जाणार आहे. त्यामुळे शेकडो सहायक शिक्षक हे शिक्षकासोबतच प्राध्यापकही बनणार आहेत. सद्यस्थितीत राज्यातील अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील पटसंख्या घसरत असल्याने शेकडो शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. कनिष्ठ महाविद्यालयांमध्येसुद्धा शेकडो प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्राथमिक शिक्षकांच्या बढतीचा प्रश्न मार्गी लावण्याचा शासन विचार करीत आहे. यामध्ये पहिली ते पाचवीच्या वर्गात शिकविणारे शिक्षक जर पदवीधर असतील, तर त्यांना सहावी ते दहावीच्या वर्गात शिकविण्याची संधी बढतीच्या माध्यमातून मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. तसेच पदवीप्राप्त असलेले व सहावी ते दहावीच्या वर्गात विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक हे पात्रतेनुसार पदवीपूर्व कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करू शकतील. तसेच प्राथमिक शिक्षकांना बढती मिळाली तर त्यांच्या वेतनामध्येसुद्धा वाढ होणार आहे. बढतीसाठी इच्छुक असणार्या शिक्षकांचे २९ डिसेंबरपासून ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात येणार असून, १५ फेब्रुवारीपर्यंंत हे अर्ज स्वीकारले जातील, अशी चर्चा शिक्षकांमध्ये आहे.
प्राथमिक शिक्षकांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना बढती देण्याविषयीचा कोणताही निर्णय अद्यापपर्यंत शिक्षण विभागाकडे प्राप्त झाला नाही आणि असा कोणताही निर्णय झाल्याचे ऐकिवात नाही; परंतु याबाबत आदेश आल्यावर त्याची अंमलबजावणी करू. -प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक.