अकोला: आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाने बुथ लेव्हलपर्यंत पोहोचण्यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी रिंगणात उतरत आहेत. प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील बुथ प्रमुखांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार आहेत.लोकसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी बुथ प्रमुख, शक्ती प्रमुख जिल्हा व तालुका पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, महानगरपालिका सदस्यांशी फेब्रुवारी महिन्यात संवाद साधणार आहेत.राज्यात २३ जानेवारी रोजी गडचिरोली, चिमूर लोकसभा मतदारसंघांतील कार्यकर्त्यांशी संवादाने सुरुवात होणार आहे. अकोला लोकसभा मतदारसंघाचा सहावा क्रमांक असून, यादृष्टीने भाजपातर्फे जय्यत तयारी सुरू असून, यासाठी अकोला लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी कामाला लागले आहेत.भाजपाचे काम, पक्षाची प्रतिमा व जनतेशी संवाद कशाप्रकारे करावा, याबाबत पंतप्रधान कार्यकर्त्यांना मंत्र देणार आहेत. या प्रयत्नातून कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे.