अकोला : जनधन खात्यात पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतून महिलांच्या खात्यात जमा झालेले ५०० रुपये जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील २३५ पोस्ट कार्यालयातून काढण्याची सोय करण्यात आली आहे. संबंधित महिलांच्या गावातच ही सोय झाल्याने बँकांमध्ये गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जिल्हा मध्यवर्ती व इतर सहकारी बँकांमध्ये खाते असलेल्यांना या सुविधेचा लाभ मिळणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.केंद्र शासनाने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतून महिलांना ५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा उपक्रम सुरू केला. योजनेतून जनधन बचत खाते असलेल्या महिलांच्या बचत खात्यात एप्रिल, मे, जून या तीन महिन्यात दरमहा ५०० रुपये जमा केले जात आहेत. चालू महिन्यात योजनेचे ५०० रुपये खात्यात जमा झाले. ती रक्कम बँकेतून किंवा (सीएससी) ग्राहक सेवा केंद्रातून काढण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांच्या सकाळपासूनच रांगा लागत असल्याचे चित्र बँक, सीएससीसमोर दैनंदिन पाहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे, त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याने कोरोना पसरण्याची भीतीही निर्माण झाली. जिल्ह्यात महिलांची जनधन योजनेची एकुण २ लाख ३५ हजार खाती आहेत. त्यापैकी १ लाख ७० हजार महिलांच्या खात्यात पहिल्या टप्प्यात ५०० रुपये जमा झाले आहेत. महिलांना रक्कम काढण्यासाठी थेट बँक किंवा सीएससी केंद्रातच यावे लागते. त्यामुळे अनेक बँकांसमोर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहावयास मिळत आहे. त्यावर उपाय म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील मिळून २३५ पोस्ट कार्यालयात ही रक्कम काढण्याची सुविधा आहे. गावातच पैसे काढण्याची सोय असल्याने महिलांनी बँकांमध्ये गर्दी करू नये, असे आवाहन पोस्ट पेमेंट बँक मॅनेजर उमेश पाटील यांनी केले आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण निधीचे पैसे पोस्टातही मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 5:47 PM