- सचिन राऊतअकोला: अमरावती विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षा ४ एप्रिलपासून सुरू होणार आहेत, तर याच कालावधीत लोकसभा निवडणुकीसाठी प्राचार्य, प्राध्यापक व परीक्षा नियंत्रकांचे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण ठेवण्यात आल्यामुळे त्यांनी कुठे उपस्थिती लावावी, या गोंधळात पडलेले आहेत. इकडे आड अन् तिकडे विहीर, अशी परिस्थिती प्राध्यापकांवर आली असून, त्यांनी परीक्षेला उपस्थित राहावे की प्रशिक्षणाला, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. दोनपैकी एकाही ठिकाणी अनुपस्थित राहिल्यास त्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे एकाच व्यक्तीने दोन ठिकाणी कसे उपस्थित राहावे, असा सवाल उपस्थित केल्या जात असून, यावर तातडीने मार्ग काढण्याची मागणी करण्यात येत आहे.अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा ४ एप्रिलपासून सुरू होणार आहे. याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसभा निवडणुकीसाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. त्यामुळे परीक्षा नियंत्रकांनी परीक्षेला उपस्थित राहावे की प्रशिक्षणाला, असा पेच त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे; मात्र यावर तोडगा काढण्याची मागणी प्राचार्य प्राध्यापक व परीक्षा नियंत्रकांनी केली आहे. एकतर परीक्षा पुढे ढकला किंवा प्रशिक्षण रविवारी घेण्यात यावे, अशी मागणी प्राध्यापकांनी केली आहे. प्रशिक्षणाला गैरहजर राहिल्यास फौजदारी तसेच दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे आणि परीक्षेला गैरहजर राहिल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा अमरावती विद्यापीठाचा इशारा आहे. त्यामुळे प्राचार्य, प्राध्यापक व परीक्षा नियंत्रकांना मोठा पेच निर्माण झाला असून, त्यांनी यामधून तोडगा काढण्याची मागणी केली आहे. अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा काही दिवस पुढे ढकलल्यास प्राचार्य, प्राध्यापक आणि परीक्षा नियंत्रकांना निवडणूक कामासाठी वेळ मिळेल आणि त्यानंतर परीक्षा घेतल्यास त्यांच्यावरही ताण येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. कोण घेणार पुढाकार?प्राध्यापक, परीक्षा नियंत्रकांना परीक्षा कामातून मुक्त करण्यात यावे किंवा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात यावे, यासाठी अमरावती विद्यापीठाने पुढाकार घ्यावा किंवा जिल्हाधिकारी यांनी लोकसभा निवडणुकीची कामे रविवारी आणि सुटीच्या दिवशी या प्राध्यापकांकडून करून घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी प्राध्यापकांकडून करण्यात येत आहे.