अकोला : बाळापूर रोडवरील रिधोरा गावाजवळील साक्षी रेस्टॉरंटवर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने सोमवारी दुपारी छापा घालून दोघा जणांना अवैधरीत्या दारूची विक्री करताना अटक केली. त्यांच्याकडून अवैध दारूचा साठा जप्त केला. याप्रकरणी जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांना रिधोरा गावाजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील साक्षी रेस्टॉरंटवर अवैध दारू विक्री करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. साक्षी रेस्टॉरंट हे पूर्वी वाइन बार होते; परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे वाइन बार बंद करण्यात आल्यावर मालकाने त्याचे नाव बदलून रेस्टॉरंट केले. अळसपुरे यांच्या पथकाने वाइन बारवर छापा घातला असता, या ठिकाणी सचिन भास्करराव भागडे(३७ रा. तापडिया नगर, रामदासपेठ) आणि अखिलेश विश्वनाथ मिश्रा (४५ रा. निवारा कॉलनी, गोरक्षण रोड) हे दोघे विदेशी दारूची अवैध विक्री करताना मिळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून ६ हजार ६१९ रुपयांची दारू आणि मोटारसायकल जप्त केली. असा एकूण ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. दोघा आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
रेस्टॉरंटवर छापा; अवैध दारू विक्री करणारे दोघे गजाआड
By admin | Published: April 18, 2017 1:51 AM