अकाेला : लॉकडाऊनमुळे मुद्रकांच्या व्यवसायात अडचणी निर्माण झाल्या आहेत आणि मुद्रकांकडे काम करणारे हातमजूर तसेच इतर संलग्नित व्यवसाय तसेच कामगार यांच्यासमोर आर्थिक अडचणींचा डोंगर उभा झाला आहे. यातून काही दिलासा मिळावा व लॉकडाऊनमध्येसुद्धा मुद्रकांचे काम सुरळीत सुरू ठेवल्यास कोणत्याही प्रकारचे संक्रमण होऊ शकत नाही, हे स्पष्ट करत मुद्रकांना कामाची मुभा द्यावी, अशी मागणी अकोला जिल्हा मुद्रक संघाचे अध्यक्ष प्रदीप गुरुखुद्दे आणि सचिव राजेंद्र देशमुख यांनी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात नमूद केले आहे की, अकोला शहरात अकोला जिल्हा मुद्रक संघाचे जवळपास १०० सदस्य असून त्यांचे आपापले प्रिंटिंग व्यवसाय आहेत. या व्यवसायाला निगडित असलेले जवळपास ५०० कुटुंबांपेक्षा जास्त कुटुंबे यांच्याशी निगडित आहेत. आमचे या क्षेत्रात सर्व अर्थव्यवस्थेचे नियोजन कोलमडले असून प्रिंटिंग प्रेसशी तसेच मुद्रण व्यवसायाशी संबंधित मजूरवर्गावर उपासमारीची पाळी आली आहे. आपण मुद्रण व्यवसायाला परवानगी देण्यात यावी. मुद्रण व्यवसायाला परवानगी न दिल्यास मुद्रण व्यवसायाशी निगडित असलेले आरोग्य सेवा, दवाखाने, मेडिकल, हॉस्पिटल, अत्यावश्यक सेवा, उत्पादक, बँका, वित्तीय संस्था, शासकीय व निमशासकीय कार्यालये इत्यादींना मुद्रित साहित्य मिळू शकणार नाही. त्यामुळे खूप अडचणी निर्माण होऊन जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार होण्याची दाट शक्यता आहे. या व्यवसायाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची गर्दी होऊ शकत नाही. आमचा व्यवसाय हा जवळपास ९० टक्के होम डिलिव्हरी बेस असून या व्यवसायाने कोणत्याही प्रकारचे संक्रमण पसरू शकत नाही, याची ग्वाही गुरुखुद्दे यांनी दिली आहे.
फाेटाे आहे