डीएमईआर संचालकांनी घेतला आढावा : कार्यक्रमाचा आराखडा निश्चितअकोला : राज्य शासनाकडून सहा जिल्हय़ांमध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येणार असून, अकोला जिल्हय़ाचाही समावेश आहे. यानुषंगाने १ मेपासून जिल्हय़ातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी पथदश्री आरोग्य पूर्वतपासणी मोहीम हाती घेण्यात येणार असून, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाकडून जोरात पूर्वतयारी सुरू आहे. याबाबतचा आराखडा निश्चित करण्यात आला असून, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालकांनी जिल्हय़ात राबविण्यात येणार्या कार्यक्रमाचा आढावा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला.गरीब, गरजू रुग्णांकरिता विनामूल्य वैद्यकीय सेवा पुरविणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश असून, यानुषंगाने जिल्हय़ातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी पथदश्री आरोग्य पूर्वतपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. पूर्वतपासणी मोहिमेच्या निष्कर्षानुसार आरोग्य यंत्रणेस प्रशिक्षण, आजाराबाबतची जनजागृती आणि शासनाच्या अस्तित्वात असलेल्या योजनांमार्फत विनामूल्य उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महाराष्ट्रदिनी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते या अभियानाचे उद्घाटन होणार आहे. जिल्हय़ात हे अभियान यशस्वीपणे राबविण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिल्या असून, ते स्वत: या अभियानाच्या पूर्वतयारीवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, बुधवारी आरोग्य उपसंचालक कार्यालयात या विषयाच्या अनुषंगाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेण्यात आली. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ. शिंगारे व मुंबई येथील जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी अभियानाच्या पूर्वतयारीचा व सूक्ष्म आराखड्याचा आढावा घेतला. बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, आरोग्य उपसंचालक कार्यालयाचे प्रतिनिधी आदींची उपस्थिती होती. डीएमईआर संचालकांनी अभियानाशी संबंधित आवश्यक सूचना केल्याची माहिती सूत्रांनी दिली.असा आहे आराखडाया अभियानांतर्गत २ ते २७ मेपर्यंत आशा स्वयंसेविका घरोघरी जाऊन आरोग्यविषयक विचारपूस करणार आहेत. आजारी किंवा इतर काही आरोग्यविषयक समस्या असलेल्या नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आणून त्यांच्याकडून २५ मुद्यांची प्रश्नावली भरून घेण्यात येईल. ही प्रश्नावली ऑनलाइन असून, ती रुग्णाच्या आधार व रेशन कार्डशी लिंक राहणार आहे. अशाप्रकारे रुग्णांचा डाटा तयार झाल्यानंतर ही माहिती मुंबईला पाठविली जाईल. त्यानंतर त्यांच्यावर आजाराच्या स्वरूपानुसार ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय आदी ठिकाणी उपचार करण्यात येतील.
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानाची पूर्वतयारी जोरात
By admin | Published: April 27, 2017 2:00 PM