आंबेडकरांशी आघाडीला प्राधान्य, अन्यथा उमेदवार तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 02:07 PM2018-11-17T14:07:17+5:302018-11-17T14:18:04+5:30

अ‍ॅड. आंबेडकरांसोबत आघाडी होत नसेल तर काँग्रेसचा उमेदवार तयार असून, इच्छुकांची संख्या वाढतीच आहे, असा सूर शुक्रवारी प्रदेश काँग्रेस कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत उमटला.

  Priority should be with Ambedkar, otherwise the candidate will be ready | आंबेडकरांशी आघाडीला प्राधान्य, अन्यथा उमेदवार तयार

आंबेडकरांशी आघाडीला प्राधान्य, अन्यथा उमेदवार तयार

googlenewsNext

अकोला: भारिप बमसंचे संस्थापक अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत आघाडी करून त्यांना अकोला लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्यास प्राधान्य द्यावे, अ‍ॅड. आंबेडकरांसोबत आघाडी होत नसेल तर काँग्रेसचा उमेदवार तयार असून, इच्छुकांची संख्या वाढतीच आहे, असा सूर शुक्रवारी प्रदेश काँग्रेस कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत उमटला. लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर अकोला लोकसभा मतदारसंघाच्या स्थितीबाबत शुक्रवार १६ नोव्हेंबर रोजी मुंबईत आढावा घेतला गेला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्टÑातील सर्व लोकसभा मतदारसंघांचा प्रदेशनिहाय आढावा १५ नोव्हेंबरपासून घेतला जात आहे. १६ नोव्हेंबरला अकोला लोकसभा मतदारसंघासंदर्भात आढावा घेण्यात आला. यावेळी महाराष्ट्राचे सहप्रभारी आशीष दुवा, विधानसभेचे विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे उपनेता विजय वडेट्टीवार, खासदार राजीव सातव, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस, आरिफ नसीम खान आदी मान्यवर उपस्थित होते.
अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपाला थांबविण्यासाठी काँग्रेसला अ‍ॅड. आंबेडकरांची साथ हवी आहे. यापूर्वी १९९८ व १९९९ मध्ये काँग्रेस सोबत अ‍ॅड. आंबेडकरांनी आघाडी करून यश मिळविले होते. त्यांची पुनरावृत्ती २०१९ च्या निवडणुकीत व्हावी असा मानस या बैठकीत व्यक्त करण्यात आला. आंबेडकरांसोबत आघाडीसाठी काँग्रेसही इच्छुक आहे; मात्र आता आंबेडकरांनी एमआयएम सोबत आघाडीचा पवित्रा घेतल्याने आघाडीचा चेंडू हायकमांडच्या कोर्टात आहे. त्यामुळे आघाडी शक्य झाली नाही तर नवा चेहरा आता उमेदवार म्हणून द्यावा, असाही प्रस्ताव या बैठकीत ठेवण्यात आला. या आढावा बैठकीला जिल्ह्यातील काँग्रेसचे महानगराध्यक्ष बबनराव चौधरी, माजी आमदार सुधाकरराव गणगणे, नातिकोद्दीन खतीब, प्रदेश महासचिव मदन भरगड, प्रदेश प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे, महापालिकेचे विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दादाराव मते पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

Web Title:   Priority should be with Ambedkar, otherwise the candidate will be ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.