अकोला: बलात्कार प्रकरणातील आरोपी अमोल महादेव देवकर (२0) हा बुधवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास कारागृहाची १७ फूट उंच भिंत ओलांडून पसार झाला होता. कोतवाली पोलिसांनी गुरुवारी त्याला भौरद येथून अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, त्याची कारागृहात रवानगी केली. एका अल्पवयीन मुलीला पळवून नेत, तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी अमोल महादेव देवकर याला २ जानेवारी रोजी मध्यवर्ती कारागृहात दाखल केले होते. दीड महिन्यांपासून अमोल हा कारागृहात होता. त्याला कारागृहातील बॅरेक क्रमांक १ मध्ये इतर कैद्यांसोबत ठेवण्यात आले. बुधवारी आरोपी अमोल देवकर याने भोजनगृहाजवळील दरवाजाचा आधार घेत १७ फूट उंच भिंत ओलांडून पलायन केले. यामुळे कारागृहात खळबळ उडाली. कारागृह अधीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या तक्रारीनुसार कोतवाली पोलिसांनी आरोपी अमोलविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध घेतला. दरम्यान, आरोपीने पातूर तालुक्यातील अंधारसावंगी गाव गाठले. त्यावेळी घराला कुलूप होते. अमोल देवकरने घराचे कुलूप तोडून घरातून पैसे घेतले आणि रात्रभर तो एका शेतात लपून बसला. गुरुवारी सकाळी तो भौरदला गेला. कोतवालीच्या गुन्हे शोध पथकाला तो भौरदमध्ये लपून बसल्याची माहिती मिळाली. पथकाने त्याला भौरदमधून अटक केली. दुपारी न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली.
कारागृहातून पसार कैदी गजाआड
By admin | Published: February 12, 2016 2:16 AM