लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: किरकोळ वादातून रेल्वे मार्ग निरीक्षक गिरीश राधाकिसन धामट यांच्या कार्यालयात घुसून त्यांना शिवीगाळ, मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी शुभदा ठाकरे यांच्या न्यायालयाने चार कर्मचाऱ्यांना दोषी ठरवित दोन महिने सश्रम कारावास आणि प्रत्येकी १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. रेल्वे मार्ग निरीक्षक गिरीश धामट यांच्या तक्रारीनुसार १ डिसेंबर २0१४ रोजी त्यांच्या कार्यालयामध्ये रवींद्र सावळे, सुरेश नेमाडे, विलास पवार, जहीर खान हे रेल्वे कर्मचारी घुसले आणि त्यांनी धामट यांना गँगमॅन कर्मचाऱ्यांची गैरहजेरी का लावता, अशी विचारण करीत अश्लील शिवीगाळ केली आणि मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. धामट यांच्या तक्रारीनुसार रामदासपेठ पोलिसांनी चौघांविरुद्ध भादंवि कलम ३५३, ३२३, २९४, ५0४, ५0६ आणि ४४८ नुसार गुन्हा दाखल केला. रामदासपेठचे पीएसआय दिलीप पोटभरे यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. याप्रकरणी मंगळवारी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी शुभदा ठाकरे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सरकार पक्षाने पाच साक्षीदार तपासले. आरोपी कलम ४४८ मध्ये दोषी आढळून आल्याने, त्यांना दोन महिने सश्रम कारावास आणि प्रत्येकी १ हजार रुपये दंड, न भरल्यास १५ दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे सहायक सरकारी विधिज्ञ एन.डी. चौधरी यांनी बाजू मांडली.
रेल्वे मार्ग निरीक्षकास मारहाण करणाऱ्या चौघांना कारावासाची शिक्षा
By admin | Published: July 12, 2017 1:17 AM