अकोला, दि. २३- राज्यात ठिकठिकाणी रुग्णालयांमध्ये होत असलेल्या डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशननेसुद्धा मार्डला सर्मथन देत शहरातील खासगी रुग्णालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गुरुवारी शहरातील डॉक्टरांनी अत्यावश्यक सेवा वगळता, रुग्णालये बंद ठेवली. शहरातील रुग्णालये बंद असल्यामुळे ग्रामीण भागासह शहरातील रुग्णांना त्याचा फटका सहन करावा लागला. अनेकांना उपचार न करताच परतावे लागले. यासोबतच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील १६ डॉक्टर आणि ९0 आंतरवासिता डॉक्टरसुद्धा पुन्हा रजेवर गेले आहेत. त्यामुळे सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णांवरील उपचार थांबले आहेत. गत काही दिवसांपासून राज्यातील धुळे, मुंबई, सोलापूर आणि औरंगाबाद येथे लागोपाठ डॉक्टरांवर हल्ल्याच्या घटना घडल्या. डॉक्टरांवरील हल्ल्याच्या घटना वाढत असतानाच, शासनाकडून कोणतीच खबरदारी घेतली जात नाही. मार्डच्या संपाला सर्मथन देत, आयएमएनेसुद्धा डॉक्टरांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे. डॉक्टरांवर होत असलेल्या हल्ल्याच्या निषधार्थ गुरुवारपासून आयएमएने शहरातील खासगी रुग्णालये, दवाखाने, बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यातून केवळ अत्यावश्यक सेवा वगळण्यात आली आहे. खासगी रुग्णालयांमधील ओपीडी आणि शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात आल्या आहेत. शासनाकडून डॉक्टरांना संरक्षण मिळेपर्यंंत खासगी रुग्णालये बंद ठेवण्याचा निर्णय आयएमएने घेतला आहे. यासोबतच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील १६ डॉक्टर रजेवर गेल्याचे पाहून त्यांचे विद्यार्थी असलेले ९0 आंतरवासिता डॉक्टरसुद्धा रजेवर गेले आहेत. यामुळे सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. रुग्णालयात आलेल्या रुग्णांना उपचार व औषधोपचाराविनाच गावी परतावे लागले. भरती असलेल्या रुग्णांवरील उपचारसुद्धा थांबले असून, त्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे दिसून येत आहे. सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टर आणि खासगी डॉक्टरांनी संप पुकारल्यामुळे रुग्णांसमोर उपचार आणि औषधोपचाराचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
आंतरवासिता डॉक्टरांची निदर्शने आणि पथनाट्य४शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आंतरवासिता डॉक्टरांनी गुरुवारी दुपारी रुग्णालय परिसरात डॉक्टरांवरील हल्ल्यासंदर्भात जनजागृतीपर पथनाट्य सादर केले आणि शासनाविरुद्ध निदर्शने करीत, डॉक्टरांवरील हल्ले थांबविण्यासाठी शासनाने संरक्षण द्यावे. अशी मागणी केली. निदर्शनांमध्ये १५0 च्यावर आंतरवासिता विद्यार्थी सहभागी झाले होते. ४अनेक व्याधींवर उपचार घेण्यासाठी ग्रामीण भागासह शहरातील हजारो रुग्ण व त्यांचे नातेवाइक शहरातील खासगी रुग्णालयांसोबतच, स्त्री रुग्णालय, सर्वोपचार रुग्णालयात येतात; परंतु डॉक्टरांनी संप पुकारल्यामुळे बाहेरगावहून आलेल्या रुग्णांना उपचार व औषधोपचार घेतल्याविनाच परतावे लागले.मार्डच्या आंदोलनाला आयएमएने पाठिंबा दिला असून, शहरातील खासगी रुग्णालये बेमुदत बंद ठेवण्यात येणार आहेत. यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. मार्डने संप मागे घेतला नाही. डॉक्टरांना संरक्षण मिळावे, ही आमची मागणी आहे. - डॉ. जुगल चिराणिया, सचिव, आयएमए
वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर रजेवर गेल्यामुळे रुग्णालयातील रुग्णसेवेवर कोणताही परिणाम पडलेला नाही. आमच्याकडे डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचारी यांचे पुरेसे मनुष्यबळ आहे. त्यामुळे रुग्णांवरील उपचार व औषधोपचारात कोणतीही कुचराई नाही. आम्ही नेहमीप्रमाणेच रुग्णांना सेवा देऊ. - डॉ. कुसुमाकर घोरपडे, प्रभारी अधिष्ठाता,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय.