अकोला : कोविड पॉझिटिव्ह अहवाल नसताना व श्वसन संस्थेशी संबंधित विकारांवर खासगी नॉनकोविड रुग्णालयांमध्ये होत असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शन्सच्या वापराबाबत शुक्रवार (दि. ९) पासून जिल्ह्यात भरारी पथकांमार्फत तपासणी केली जाणार आहे. या संदर्भातील आदेश गुरुवारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी झालेल्या बैठकीत दिले.
सायंकाळी झालेल्या टास्क फोर्स समितीच्या बैठकीत रेमडेसिवीर इंजेक्शन्सच्या तुटवड्याबाबत व त्या अनुषंगाने प्राप्त होत असलेल्या तक्रारींबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, डॉ. श्यामकुमार शिरसाम तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी पापळकर यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना यासंदर्भात दोन भरारी पथके गठीत करण्याचे निर्देश दिले. खासगी नॉन कोविड रुग्णालयात या इंजेक्शन्सचा वापर केल्याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांचे समावेश असलेले पथक हॉस्पिटल्सची तपासणी करतील व प्रशासनाला अहवाल सादर करतील.