अकोला : राज्य शासनाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास योजनेची सुरुवात २६ ऑगस्टपासून केली, तर १७ मार्चपासून महिला सन्मान याेजनेंतर्गत महिलांना सरसकट ५० टक्के सवलत योजना सुरू केली. या योजनेचा फटका खासगी प्रवासी वाहतूकदारांना बसत असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
राज्यात बेरोजगारी वाढत असल्याने अनेक सुशिक्षित युवक आणि इतरांनी वाहनचालकाचे प्रशिक्षण घेऊन खासगी वाहने खरेदी करीत पोटापाण्याची सोय केली आहे. त्याचा खासगी वाहनावर चालक म्हणूनही अनेक बेरोजगार तरुणांना रोजगाराचा आधार मिळाला होता. आधीच वाहतुकीचे कठोर नियम आणि वाढता डिझेल खर्च, यामुळे त्यांना जेमतेम मजुरी हातात पडत होती. अशातच शासनाने काही वर्षांपूर्वी ६५ वर्षांवरील नागरिकांना ५० टक्के सवलत दिल्याचा परिणाम त्यांच्या व्यवसायावर झाला असतानाच गतवर्षी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजने’द्वारे ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास योजना सुरू केली. त्यानंतर गत १७ मार्चपासून महिना सन्मान योजनेंतर्गत महिलांना प्रवासात सरसकट ५० टक्के सवलत सुरू केली. त्यामुळे खासगी प्रवासी वाहतूकदारांचा व्यवसाय संकटात सापडला.
अकोला-वाशिम, अकोला-कारंजा मार्गावर प्रवासी मिळेनातखासगी प्रवासी वाहनधारकांची पाचपेक्षा अधिक वाहने अकोला-वाशिम मार्गावर धावतात. एसटीने महिलांना प्रवासात ५० टक्के सवलत दिल्यानंतर या मार्गावर खासगी वाहने रिकामीच धावत असल्याचे चित्र आहे. अकोला-अकोट या मार्गावर सर्वाधिक खासगी वाहने धावतात. वाहनांची संख्या अधिक असतानाच एसटीच्या सवलत योजनेमुळे यातील बहुतांश वाहने तीन-चार प्रवासी घेऊनच धावताना दिसतात.
अकोला - कारंजा मार्गावर काळीपिवळीसह इतर खासगी प्रवासी वाहने दिवसभर धावतात. एसटीने महिलांना ५० टक्के सवलत दिल्याने या वाहनधारकांची प्रवासी मिळविण्यासाठी कसरत सुरू आहे.