अकोला : गत अनेक वर्षांपासून सेबीच्या कारवाईत अडकलेल्या पॅन कार्ड क्लबचा निकाल आगामी १२ जुलै २०१९ रोजी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.शुक्रवार, २८ मे रोजी एनसीएलटी कोर्टाचा निकाल लागणार होता; मात्र यादरम्यान राष्ट्रशक्ती संघटनेने नवीनच मुद्यावर आक्षेप नोंदविल्याने ही सुनावणी पुन्हा पुढे ढकलली गेली आहे. पुन्हा निकालास विलंब होण्याची शक्यता वाढल्याने गुंतवणूकदारांची ओरड सुरू झाली आहे. राष्ट्रशक्ती संघटनेने दिलेल्या कारणांत त्यांनी सेबीची प्रक्रिया मान्य केली. त्यात त्यांनी एनसीएलटी कोर्टाला १४९१९ लोकांची संमती दर्शविली आहे.वास्तविक पाहता, पॅन कार्डचे गुंतवणूकदार सातत्याने लढत आले असून, त्यांची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात होती. एकूण ५२ लाख लोकांसाठी लढत असताना राष्ट्रशक्तीने केवळ १४९१९ लोकांची संख्या पुढे आणली आहे. त्यामुळे पुन्हा नव्याने अनेक पेच निर्माण होत आहेत. गत अनेक वर्षांपासून सामूहिक लढा देत असलेल्या संघटनेने विथ मॅच्युरिटी अमाउंट मिळण्यासाठी पुढाकार घेतला आहे; मात्र राष्ट्रशक्तीच्या आक्षेपामुळे आता त्या बाबी वादात सापडल्या आहेत. कधीकाळी सेबीच्या विरोधात राहणाऱ्या राष्ट्रशक्तीने अचानक बाजू बदलल्याने शंका-कुशंका व्यक्त होत आहेत. आगामी १२ जुलै रोजी आता काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.