अकोला : जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या निवडणुकीत आरक्षित जागेवर निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून जात वैधता प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव स्वीकारण्याची प्रक्रिया २२ नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील तहसील कार्यालयात सुरू करण्यात आली आहे.जिल्हा परिषद व त्यांतर्गत सातही पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे ५३ गट आणि पंचायत समित्यांच्या १०६ गणांसाठी घेण्यात येत असलेल्या निवडणुकीसाठी ‘आॅनलाइन’ उमेदवारी अर्ज दाखल करणे १८ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत आरक्षित जागेवर निवडणूक लढविणाºया इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करताना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. तथापि, जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास संबंधित उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव सादर केल्याच्या पोच पावतीसह हमीपत्र सादर करून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. त्यानुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तहसील कार्यालयांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत आरक्षित जागेवर निवडणूक लढविणाºया इच्छुक उमेदवारांकडून जात वैधता प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव स्वीकारण्याची प्रक्रिया २२ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. तहसील कार्यालयांमध्ये प्राप्त होणारे जात वैधतेचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात येणार असून, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जात वैधता प्रमाणपत्रांचे प्रस्ताव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर करण्यात येणार आहेत. त्यामुळे जात वैधता प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव सादर करण्याकरिता जिल्ह्यातील तहसील कार्यालयांमध्ये इच्छुक उमेदवारांची गर्दी होणार आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आरक्षित जागेवर निवडणूक लढविणाºया इच्छुक उमेदवारांकडून जात वैधता प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव स्वीकारण्याचे काम २२ नोव्हेंबरपासून तहसील कार्यालयात सुरू करण्यात आले आहे.-विजय लोखंडे,तहसीलदार, अकोला.